कोल्हापूर : ‘पद्माराजे गार्डन’ हा प्रभाग तसा शिवाजी पेठेचा गाभाच. या प्रभागात खंडोबा तालीम, नाथा गोळे, सरदार तालीम, संध्यामठ, मरगाई तालीम परिसराचा काही भाग या प्रभागात येतो. या प्रभागाचे नेतृत्व माजी उपमहापौर विक्रम जरग यांनी केले होते. त्यांना नवखे व भाजपचे नेते रामभाऊ चव्हाण यांचे पुतणे अजिंक्य शिवाजीराव चव्हाण यांनी जबरदस्त आव्हान निर्माण केले. त्यानुसार मतदानातही हीच बाजी राखत ७९६ मतांनी विजयीही संपादन करत चव्हाण कुटुंबीयांवर गुलाल उधळणाची संधी कार्यकर्त्यांना दिली. रामभाऊ चव्हाण यांचे बंधू कै. शिवाजीराव चव्हाण यांनी १९९० मध्ये महापालिकेची निवडणूक लढविली होती. मात्र, भिकशेट पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांच्या घरातील सदस्याला काही कारणांनी निवडणूक लढविता आली नाही. यंदा मात्र कै. शिवाजीराव यांचे चिरंजीव अजिंक्य चव्हाण यांनी पद्माराजेमधून निवडणूक लढविली आणि पहिल्या दणक्यात विजय संपादन केला. जरग आणि चव्हाण यांच्यातच लढत अपेक्षित होती. त्यानुसार अजिंक्य चव्हाण यांनी ३९८४ मतांपैकी १९१३ मते मिळवली. तर नजीकचे प्रतिस्पर्धी विक्रम जरग यांना १११७ मते पडली. त्यामुळे त्यांचा ७९६ मतांनी पराभव झाला. त्यातच शिवसेनेकडून महेश चौगले यांनीही ६३३ मते मिळवली तर ‘ताराराणी’कडून मूळचे काँग्रेसचे असणारे विक्रम जरग यांनी कामाच्या शिदोरीवर मते मागितली. चव्हाण-जरग यांनी प्रभागाचा विकास हाच मुद्दा प्राधान्यक्रमाने उचलला. काँग्रेसचे शेखर पोवार यांना केवळ ८८ मतांवर समाधान मानावे लागले. चव्हाण यांनी विजय मिळविताना ७ उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त केले. शिवाजी पेठेसारख्या ठिकाणीही वरीलपैकी एकाही उमेदवाराला मतदान नाही, असे २४ जणांनी नोंदवले तर टपालाने ९ जणांनी मतदान केले. त्यापैकी चव्हाण, जरग यांना प्रत्येकी चार जणांनी, तर आकाश बेंद्रे यास एक मत मिळाले. चव्हाण कुटुंबीयांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती. त्यानुसार त्यांनी नियोजनबद्ध व्यूहरचना केली. आमदार हसन मुश्रीफ, माजी महापौर सुनीता राऊत, माजी नगरसेवक पिंटू राऊत, बबनराव कोराणे, उत्तम कोराणे आदींनी अजिंक्यसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने विजय सुकर झाला.
‘पद्माराजे’त ‘अजिंक्य’चीच बाजी--पद्माराजे गार्डन
By admin | Published: November 03, 2015 12:18 AM