कोल्हापूर - आई-वडीलांसोबत दुचाकीवरून जात असताना गळ्याला मांजा अडकून दीड वर्षाचे बालक गंभीर जखमी झाले. वरद अमृत पाटील (रा. शिंगणापूर, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याचेवर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केली. रविवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास कोल्हापूर-गगनबावडा रोडवर नागदेववाडी फाटा येथे ही घटना घडली. त्यामध्ये बालकाचे वडील अमृत आनंदा पाटील हे किरकोळ जखमी झाले.
अधिक माहिती अशी, अमृत पाटील हे दिवाळीनिमित्त बालिंगा येथे खरेदीसाठी दूचाकीवरुन येत होते. पुढे टाकीवर मुलगा वरद तर पाठिमागे पत्नी बसली होती. नागदेववाडी फाटा येथे अचानक वरदच्या गळ्याला मांजा दोरा अडकून गळा चिरला. अमृत यांनी अचानक बालकाच्या गळ्याला मार लागल्याने स्वत:ला सावरत दूचाकी थांबवली. मुलगा वरदच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन रस्त्यावर रक्तस्त्राव झाला. यावेळी मांजा अमृत यांच्या हाताच्या दंडाला घासून टिशर्ट फाटून दूखापत झाली. बाळाचा अक्रोश पाहून आई-वडील दोघेही बिथरून गेली. आजूबाजूच्या नागरिकांनी धिर देत त्यांना तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. बालक वरद यांचेवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे सहा टाके गळ्याला पडले आहेत. प्रकृत्ती अत्यावस्थ झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलविले.