राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ठरावीक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याला मुभा देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाचाच फायदा मुंबईतील एका बड्या कंपनीने उठविला आहे.
या कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात चॉकलेटमधील साखरेएवढीच म्हणजे ३० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली आहे. पनवेल आणि वाशी येथील गोदामामध्ये ती ठेवण्यात आली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. याचा परिणाम म्हणून साखरेचे दर गडगडले आहेत. साखर उद्योगाच्या अडचणीतही वाढ झाली आहे.
देशात ३१६ लाख टन यंदा साखरेचे उत्पादन, तर गेले वर्षीचे ४० लाख टन साखर शिल्लक आहे. त्यात आंतरराष्टÑीय बाजारपेठेत साखरेला मागणी नसल्याने उठाव होत नाही. परिणाम देशांतर्गत बाजारपेठ कमालीची घसरल्याने साखर उद्योग अडचणीत आहे. एफआरपीप्रमाणे पैसे देण्यासाठी कारखान्यांकडे पैसे नाहीत. शेतकरी, साखर कारखानदारांच्या रेट्यानंतर केंद्राने निर्यात अनुदानाची घोषणा करीत आयातशुल्क वाढविले. त्यामुळे बाजारातील साखरेचे दर स्थिर होतील, अशी अपेक्षा असतानाच पाकिस्तानची साखर आयात झाल्याने साखर उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानच्या साखरेचे दर स्थानिक साखरेपेक्षा एक रुपयांनी कमी आहेत.परिणामी स्थानिक साखरेला फटका बसत असून, आधीच दरात घसरण झाली असताना त्यात हे संकट उभे राहिल्याने साखरउद्योग तग धरणार का? याविषयीची चिंता व्यक्तकेली जात आहे.घाऊक बाजारात साखर २४२० रुपयेसाखरेच्या दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत नाही. कारखान्यांमध्ये साखरेची गोडावून फुल्ल आहेत आणि मागणी नाही. त्यामुळे सध्या बाजारात प्रतिक्विंटल २४२० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे.सहा महिने ‘रेक’ मोकळीच कोल्हापुरातून रोज २६०० टन साखर रेक (रेल्वे) मधून पंजाब, पश्चिम बंगाल, गुवाहाटी, आदी राज्यांत जात होती; पण गेले सहा महिन्यांपासून एकही रेक जाऊ शकलेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आयात शुल्कात पळवाट काढून अशा प्रकारे साखर देशात आल्याने साखर उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन आयातीबाबत कडक पावले उचलली नाहीतर हा उद्योग उद्ध्वस्त होईलच, पण शेतकरीही देशोधडीला लागेल.- पी. जी. मेढे, तज्ज्ञ, साखर उद्योग