सरदार चौगुले ल्ल पोर्ले तर्फ ठाणेमाणसांच्या स्वभाव-गुणावरून ‘आठ हात वाळूक आणि नऊ हात बी’ अशी पूर्वांपार म्हण प्रचलित आहे. काकडीला ग्रामीण भाषेत ‘वाळूक’ म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की, काकडी मनुष्याच्या शरीरातील उष्णतेचा दाह कमी करते, असा आयुर्वेदात उल्लेख आहे. अशा हिरव्यागार व चविष्ट काकडीचे उत्पादन पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावात गेल्या पन्नास वर्षांपासून घेतले जात आहे. काकडीचं गाव म्हणून पोर्लेची जिल्ह्यात वेगळी ओळख आहे. शहरातील गल्ली-बोळाचा कोपरान् कोपरा पोर्लेच्या काकडीने व्यापलेला दिसतो. आहारात चव निर्माण करणाऱ्या पोर्लेच्या काकडीला फळभाज्याच्या गटात ‘क्वीन’ राणीचा दर्जा प्राप्त आहे.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पन्हाळ्याला ‘गडाचा’ तालुका म्हणून ओळखले जाते. पन्हाळ्याच्या पायथ्याशी वसलेल्या पोर्ले तर्फ ठाणे या गावाच्या दक्षिणेला कासारी नदी बारमाही दुथडी भरून वाहते. म्हणूनच गावातील शेती सुजलाम् सुफलाम् बनली आहे. हेच इथल्या सज्जनतेचे प्रतीक मानले जाते. या गावाला कोल्हापूरची बाजारपेठ जवळची आहे. त्यामुळे इथला कष्टकरी शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व आर्थिक उन्नतीसाठी उन्हाळ्याच्या ऋतूत काकडीच पिकविणे उचित समजतो. पोर्लेच्या शिवारातील काळी कसदार दमाची शेती व काकडीला पोषक असे वातावरण आहे. या बळावर गावातील प्रत्येक शेतकरी काकडीचे पिक घेण्यास प्राधान्य देतो. पोर्लेतील काकडीच्या उत्पादनातील आर्थिक उलाढाली पाहून शहराच्या आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी काकडी पीक घेण्याचा प्रयत्न केला; पण पोर्लेच्या शेत जमिनीची बातच काही न्यारी, त्यामुळे चवदार, विनाऔषधी काकडीला गिऱ्हाइकांची पहिली पसंती असते.ऊस पिकात आंतर पीक घेत चार महिने शेतात पिकणारी काकडी शेतकऱ्याला बऱ्यापैकी पैसा मिळवून देते. विक्रीच्या दरम्यान मिळणारा पैसा गाठीला गाठ मारून ‘त्या’ पैशातून कौटुंबिक गरजांना मदत होते. संसार फुलविण्यासाठी मदत मिळणाऱ्या काकडीच्या विक्रीचे काम महिला चिकाटीने करतात. शेतातून काकडी तोडल्यापासून ते विक्रीपर्यंत महिलाच ‘कारभारणी’ असतात. पोर्लेतील स्थानिक शेतकरी उसाची मोडणी लवकर करून त्यात काकडीसाठी मशागत करून घेतो आणि पाच फुटांच्या अंतराने सारटं (सऱ्या) काढली जातात. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर त्या सरीत फुटाच्या अंतराने काकडीच्या बिया टोकणल्या जातात. त्यानंतर ३० दिवसांत काकडीचा वेल सारटांवर पसरून फुलायला लागतो. ४५ ते ५० दिवसांनंतर फळ धरायला सुरुवात होते. साधारणपणे दोन महिन्यांनी काकडी लागायला सुरुवात होते. पहिला भार महिनाभर असतो. त्यानंतर पंधरवड्याने परत फुटीचा दुसरा भार येतो; पण तो कमी मिळतो. मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतर काकडीचे वेल काढायला शेतकरी सुरुवात करतात. शेतकरी बायकापोरांसह भल्या पहाटे काकडी तोडायला शिवारात असतात. प्रत्येक सारटातील वेलाच्या गर्दीत झाकलेली काकडी हुडकून तोडली जाते. ती स्वच्छ पाण्याने धुऊन, तिचे डालग्यात ओझं केलं जातं. हा माल मालवाहू गाडीतून किंवा एस.टी.ने कोल्हापूरच्या बाजारात विक्रीसाठी आणला जातो. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, रेल्वे स्टेशन, महानगरपालिका परिसर, शहराच्या मध्यवस्तीतील पोर्लेची काकडी हातोहात विकली जाते. इतर भाजीपाला अनेक मार्केटला व्यापारांच्याकडे जातो; पण पोर्लेची काकडी शंभर टक्के गावातील शेतकरी महिला स्वत: विकत असतात. हेच पोर्लेच्या काकडीचे खास वैशिष्ट्य आहे. कामानिमित्त कोल्हापूरला आलेल्या माणसाला पोर्लेची हिरवीगार काकडी भुरळ घालतेच. तोच माणूस खाली वाकून दोन्ही हातांच्या ओंजळीत मावेल एवढी काकडी आवर्जुन घेतोच.शेती हा व्यवसाय नियोजनबद्दरीत्या केल्यास रोजगार आणि पैसा दोन्ही मिळू शकतो, हे पोर्लेतील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. काकडीच्या किरळीला मागणीहिरव्यागार व बारीक काकडीच्या किरळीला गिऱ्हाइकांकडून जादा पसंती असल्याने तिला चांगला भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी काकडीचा रोजच्या रोज तोडा करतो; परंतु काकडीचा तोडा करताना दाट वेलामुळे नजरेतून चुकलेले काकडी मोठी होते. तिला फारसा प्रतिसाद मिळत नाही, तर पडक्या भावाने खरेदी करतो. याच मोठ्या काकडीला लग्नसराईत कोशिंबिरसाठी मोठी मागणी असते. किमतीत चढ-उतार काही शेतकरी सुरुवातीला काकडीला चांगला भाव मिळतो, म्हणून पीक लवकर घेतात. बाजारात काकडीची आवक कमी असली की प्रतिकिलो ८० रुपये भाव मिळतो. आवक वाढली की तीच काकडी प्रतिकिलो २० रुपयाने विकली जाते. गत हंगामात काकडीच्या उत्पादनात कमालीची घट होती, त्यामुळे सुरुवातीपासूनचा भाव शेवटपर्यंत टिकून होता. यावर्षी फळभाज्यांसाठी वातावरण पोषक असल्याने काकडीचे उत्पादन भरघोस आहे. त्यामुळेच काकडीचा भाव पडत आहे, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.काकडीचे ‘बी’ ८०० रुपये किलोपोर्लेच्या काकडीने मार्केटमध्ये नाव केले आहे. म्हणूनच इथल्या काकडीच्या ‘बी’ला सर्वत्र मागणी आहे. काकडीचे ‘बी’ ८०० रुपये किलोने विकले जाते. त्यामुळे गावातील काकडी उत्पादक शेतकरी ‘बिया विक्रीतून हजारो रुपयांची कमाई करतात.पोर्लेतील काकडीला चॅलेंज म्हणून एका नामांकित कंपनीने संकरित ‘बी’ बनविण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांचे संशोधन कडेला गेले नाही. कारण, पोर्लेच्या पोषक वातावरणात बहरणारी काकडी व त्याच्या ‘बिया’ सर्वोत्कृष्ट असल्याचे त्या कंपनीच्या निष्फळ ठरलेल्या प्रयत्नावरून स्पष्ट जाणवते.निसर्गाच्या लहरीपणाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. पोर्लेतील काकडीला औषध फवारणीची फारशी आवश्यकता नसते. इथली काकडी काळी कसदार जमिनीत व पोषक हवामानात पिकते. तसेच काकडी पीक औषधाला फारसा प्रतिसाद देत नाही. त्यामुळेच बाजारात या काकडीला मागणी वाढत आहे.
पोर्लेची चवदार काकडी, नजर नको वाकडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2017 11:55 PM