राजू कांबळे
शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यातील शाळी नदीच्या उगम स्थानावर शासनाच्या पाटबंधारे विभागाने बांधलेल्या पालेश्वर धरण परिसराला ' क 'वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास होणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धरण परिसराला 'क' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. उन्हाळा व पावसाळ्यात येथे पर्यटकांची गर्दी होते. दरवर्षी सुमारे एक लाख पर्यटक पालेश्वर धरणाला भेट देत असतात. पालेश्वर धरणाचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.धरणात बोटींगची सुविधा झाल्यामुळे पर्यटकांना संपूर्ण धरण परिसर जवळून पाहता येणार आहे. क वर्ग पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी शासन स्तरावर निधी उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील उदगिरी येथील श्री काळाम्मादेवी, श्री जुगाईदेवी, श्री धोपेश्वर आदी देवस्थांना ना क वर्ग यात्रा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे.२ हजार ५५० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली मृद व जलसंधारण उपविभाग शिरोळ मुख्यालयाच्या अंतर्गत शाहूवाडी, हातकंणगले, शिरोळ, पन्हाळा या चार तालुक्यात शासनाच्या वतीने झालेल्या लघु पाटबंधारे तलावाच्या कामामुळे चार तालुक्यातील दोन हजार ५५० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. शेतीला बारा महिने पाणी मिळत आहे. यामुळे शेतकऱ्याचे जीवनमान उंचावले आहे.