राजू कांबळेशाहूवाडी : तालुक्यात गेली चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे शाळी नदीच्या उगम स्थानावर पाटबंधारे विभागाने बांधलेले पालेश्वर धरण शंभर टक्के भरले. धरणाच्या सांडण्यातून नदी पात्रात विसर्ग होत आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.तालुक्यातील धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. संततधार पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले आहेत. पालेश्वर धरण परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आज, गुरुवारी सकाळी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग शाळी नदी पात्रात होऊ लागला आहे. सांडव्यातून पडणारे पाणी पाहण्यासाठी नागरीक व पर्यटक गर्दी करू लागले आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शाळी नदी काठावरील उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या धरणाच्या पाण्यावर जवळपास दहा गावे अवलंबून आहेत. धरणाच्या खाली छोटा धबधबा असून येथे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. तालुक्यातील पहिलेच धरण शंभर टक्के भरून ओव्हर फ्लो झाले आहे.
Kolhapur: शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यातून समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 1:33 PM