कोल्हापूर : पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पेट्रोलियम ऑईल आणि गॅस इंजिनिअरिंगच्या व्यवसायात पल्लवी यादव जाणीवपूर्वक उतरली आहे. कोल्हापूरातून समुद्रावरील तरंगत्या काळ्या सोन्यासाठी देशविदेशातील तेलविहिरीसाठी ड्रिलिंग रिगवर पाय घट्ट रोवून आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळविणे ही सोपी गोष्ट नाही, पण पल्लवीने ते साध्य केले आहे.तेल हे सर्वात महत्वाच्या खनिजांपैकी एक आहे. हे किंमती "काळे सोने" समुद्राबाहेर काढण्यासाठी ड्रिलर्स ड्रिलिंग रिग बांधतात आणि खोलवर ड्रिल करुन विहिरी निश्चित करतात. विहीर ड्रिलिंग हे तेल उत्पादनातील मुख्य ऑपरेशन्सपैकी एक आहे. यासाठी देशोदेशीच्या अनेक कंपन्यांना फील्डवर काम करणाऱ्या पेट्रोलियम इंजिनिअर्सची आवश्यकता भासत असते. यामध्ये प्रामुख्याने पुरुष इंजिनिअर्स अधिक असतात. परंतु वीस वर्षापूर्वी घरच्यांचा आणि सहकाऱ्यांच्या विरोधाला डावलून पल्लवीने हे काम सुरु केले. तिच्या धाडसी स्वभावाला हे आव्हानच स्वीकारायचे होते आणि ते तिने यशस्वीपणे पेलले आहे.मूळची पन्हाळा तालुक्यातील उंड्री गावची असलेल्या पल्लवीचे अंबाई डिफेन्स सोसायटीत बालपण गेले. प्राथमिक शिक्षण कोल्हापूरातील हॉलिक्रॉस कॉन्व्हेन्ट स्कूलमधून आणि महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेजमधून पूर्ण केले. नंतर पुण्यातून पेट्रोलियम टेक्नॉलॉजीची पदवी घेतली. यातूनच धाडसी आणि आव्हानात्मक कामे करण्याची जिद्द निर्माण झाली.
त्यामुळे पुढे कारकीर्द सुरु झाली तेव्हा अमेरिका, कतार, दुबई (पर्सियन गल्फ) आणि भारतात बॉम्बे हाय (ओएनजीसी), ईस्ट कोस्ट ईजी बेसिन, याठिकाणच्या पेट्रोलियम क्षेत्रात काम केल्यानंतर बेकर ह्यूगर्स, हॉली बर्टन या अमेरिकन कंपन्यांसाठी समुद्रातील जॅकअप ऑईल रिगवर तर इराकमध्ये लॅन्ड रिगवर इंजिनिअर म्हणून काम करण्याची संधी तिला मिळाली. पल्लवीला साहसाची आवड असल्याने मोटर स्पोर्टस, कार रेसिंग यासारखे साहसी छंदही तिने जोपासले. पल्लवीला हॉलिवूडपटातही चमकण्याची संधी मिळाली. व्हाईट टायगर या सिनेमात अभिनेत्री प्रियंका चोप्रासाठी बॉडी डबल म्हणून तिने थरारक स्टंटबाजीही केली.
जगात कुठेही जाण्याची तयारी करामिश्र अर्थव्यवस्थेमुळे भविष्यात आणखी वीस वर्षे तरी हायड्रोकार्बनचा वापर सुरु राहणार आहे. यामुळे इंधनाला पर्यावरणपूरक समर्थ पर्याय उपलब्ध होईपर्यंत या क्षेत्रात करियर करता येणार आहे. जगात कुठेही जाण्याची तयारी असणाऱ्या तरुणींना हे क्षेत्र जोपासता येईल. भविष्यात मेकॅनिक, पेट्रोलियम इंजिनिअर्सना उर्जा क्षेत्रात करियर करणे फायद्याचेच राहणार आहे, असे पल्लवीचे स्पष्ट मत आहे.
सामान्यपणे इंजिनिअर्स जमिनीवर काम करतात. परंतु नैसर्गिक वायू आणि गॅस, तेल यासारख्या क्षेत्रात फील्डवर काम करण्यासाठी समुद्रात जावे लागते. घरदार, मित्रमंडळींना सोडून कंपनी म्हणेल त्या देशात भर समुद्रात सलग दहापंधरा दिवस काम करण्यासाठी कस लागतो. यापुढे डॉक्टरेट मिळवून उर्जा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ होण्याकडे माझी वाटचाल सुरु आहे. - पल्लवी शामराव यादव.
शब्दांकन : संदीप आडनाईक