कोल्हापूर : कुरुंदवाड ते प्रयाग चिखली अशी ‘संगम ते उगम’ निघालेली पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठीची पायी जागर यात्रा नदीकाठावरील १३ गावांतून ७२ किलोमीटरचा प्रवास करून रविवारी कोल्हापुरात दाखल झाली. सकाळी आमदार उल्हास पाटील, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हजारभर कार्यकर्त्यांनी मंदिरात जाऊन अंबाबाईला प्रदूषणमुक्तीसाठी साकडे घातले.रविवारी रात्री पंचगंगेचे उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखली येथील दत्त मंदिरात या यात्रेची सांगता होणार असून, तेथेच मुक्काम होणार आहे. आज, सोमवारी तेथून निघून दसरा चौकात जमून ११ वाजता जाहीर सभा होणार आहे. येथे स्वत: डॉ. मुळीक, आमदार उल्हास पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देऊन प्रदूषणमुक्तीसाठी कराव्या लागणाºया उपाययोजनांच्या संदर्भात चर्चा करणार आहेत.भूमाता संघटनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संघटनेचे डॉ. बुधाजीराव मुळीक व आमदार उल्हास पाटील यांनी पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी पायी जागर यात्रा सुरू केली आहे. शुक्रवार (दि. ४)पासून सुरू झालेली ही यात्रा कुरुंदवाड येथील घाटावरील संताजी घोरपडे समाधीस्थळावर पाणी पूजनाने झाली. कुरुंदवाड, नृसिंहवाडी, भैरववाडी, इचलकरंजी असा पहिल्या दिवशी प्रवास झाला.
दुसऱ्या दिवशी चंदूर, रुई, माणगाव, रुकडी, वळीवडे अशा मार्गावर प्रबोधनाचा जागर झाला. तिसऱ्या दिवशी गांधीनगरातून तावडे हॉटेलमार्गे ही यात्रा कोल्हापुरात दाखल झाली. कोल्हापुरात आल्यानंतर अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेत देवीला साकडे घालण्यात आले. त्यानंतर ही रॅली प्रयाग चिखलीकडे मार्गस्थ झाली. रविवारी तेथे वस्ती करून सोमवारी ती दसरा चौकात परतणार आहे. तेथे दुपारी १२ च्या सुमारास जाहीर सभा होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणारचार दिवसांच्या या पायी यात्रेत पंचगंगेला प्रदूषणापासून मुक्ती देण्याचा नारा देत, त्या दिशेने ठोस पावले उचलण्याची मानसिकता लोकांमध्ये तयार करण्याचा प्रयत्न झाला. आता या चार दिवसांत नदीकाठावरून येताना नदीतील जे दृश्य दिसले त्यावर आता शासनस्तरावर कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार, याबाबतीत आता शासनपातळीवर पाठपुरावा करण्याचे आयोजकांचे धोरण आहे. त्याुनसार प्राथमिक टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
नदी वाचवण्याची जाणीव प्रकटचार दिवसांच्या या पायी यात्रेत नदीकाठावरील १२ गावांतील ५0 हजार लोक सहभागी झाले. जवळपास २४ हजार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून प्रदूषणमुक्तीच्या जागरात सहभाग घेतला. ही यात्रा ज्या-ज्या गावांतून गेली, तेथील स्थानिक ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रबोधनाचे विचार ऐकतानाच कार्यकर्त्यांची जेवण-खाण्याची आणि निवासाच्या व्यवस्थेसह संपूर्ण यंत्रणा राबली. यातून एकीचा संदेश तर दिसलाच, शिवाय आपली नदी आपण वाचवायला पाहिजे, ही जाणीवही दिसली.