कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणास मोठा हातभार लावणारे शहरातील जयंती, दुधाळी व लाईन बझार नाल्यांतील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’ने ‘पंचगंगा ते गटारगंगा ..एक प्रवास’ या मथळ्याखाली बुधवारी प्रसिद्ध केले होते. यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या नाल्यांची पाहणी करून प्रदूषणास कोल्हापूर महापालिका जबाबदार असल्याबाबत आयुक्तांना नोटीस पाठवून सात दिवसांत खुलासा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मंगळवारी पर्यावरणदिनीच जयंती नाल्यातील फेसाळणारे दूषित सांडपाणी सांडव्यावरून वाहत होते. नाल्यानजीकच्या पंपिंग हाऊसमधील उपसा पंप बंद पडल्याने हे सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत असल्याचे निदर्शनास आले. तसेच दुधाळी व लाईन बझार नालाही थेट नदीत मिसळत होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर, उपप्रादेशिक अधिकारी गायकवाड यांनी जयंती नाला, दुधाळी नाला, लाईन बझार नाला यांची पाहणी केल्यानंतर सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
जयंती व दुधाळी नाल्यांवरील निर्जंतुकीकरण प्रक्रिया बंद असल्याचे आढळले. दोन्हीही नाल्यात वाहता घनकचरा व सभोवती काठावर कचºयाचे ढीग आढळले. दुधाळी येथील घरगुती सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, हे पाहणी दौºयात दिसून आले. त्यामुळे हे नाले स्वच्छ केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीवरून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने महापालिकेच्या आयुक्तांना नोटीस बजावून सात दिवसांत खुलासा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.नालेसफाईचा दिखावामहापालिकेत मंगळवारी (दि. ५) सायंकाळी महापौर शोभा बोंद्रे यांनी आपत्ती व्यवस्थापन तयारी आणि नालेसफाई मोहिमेबाबत बैठक घेऊन आढावा घेतला. त्यावेळी शहरातील नाले जेसीबी यंत्र लावून स्वच्छ केल्याचे अधिकाºयांनी उत्तर दिले; पण दुसºया दिवशी, बुधवारी पंचगंगेपर्यंतचे सर्व नाले प्लास्टिकच्या कचºयाने भरल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळास दिसले.पंचगंगा घाट झाला चकाचकस्वच्छता मोहीम : सुस्तावलेल्या महापालिकेला आली जाग; आजही मोहीम राबविणारकोल्हापूर : कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. कोल्हापुरातील नदीघाट तर कचरा, निर्माल्यामुळे अस्वच्छतेने भरून गेला होता. या अस्वच्छतेच्या विळख्यात अडकलेल्या नदीघाटाचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी ‘मला वाचवा : पंचगंगेची आर्त हाक’ या मथळ्याखाली प्रसिद्ध होताच महापालिकेच्या सुस्तावलेल्या यंत्रणेला खडबडून जाग आली. गेल्या दोन दिवसांत महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुमारे ३० हून अधिक कर्मचारी लावून हा घाट स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली आहे.जागतिक पर्यावरण दिनादिवशी महापालिकेला पंचगंगा घाटावर पडलेला दुर्गंधीयुक्त कचरा काढण्याचेही भान राहिले नव्हते. पंचगंगा घाटावरील अस्वच्छतेचे चित्रण हे धक्कादायक होते. घनकचरा, प्लास्टिक, जनावरे व कपडे धुणाºयांची वाढती संख्या, आदींमुळे पंचगंगा नदीपात्र दुर्गंधीने ग्रासले होते. कचरा व गाळामुळे कोल्हापुरात अधिक मासानिमित्त येणाºया पर्यटकांना स्नान करण्यासाठी जागाही राहिलेली नव्हती. त्यामुळे हे अस्वच्छतेचे दर्शन सर्वसामान्यांना विचार करायला लावणारे होते.त्याची दखल घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुमारे ३० हून अधिक कर्मचारी लावून पंचगंगा घाट तातडीने स्वच्छ केला. तसेच आज, गुरुवारपासून जेसीबीद्वारे कर्मचाºयांची संख्या वाढवून उर्वरित कचरा काढण्यात येणार असल्याचे आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे यांनी सांगितले.