कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची शारदीय नवरात्रौत्सवांतर्गत पंचमीची पालखी व नगरप्रदक्षिणा वाहनातून काढण्यात येणार आहे. मात्र यावेळी परिसरात व मार्गावर भाविकांची गर्दी होणरा नाही यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.नवरात्रौत्सवाला १७ तारखेपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक झाली. यावेळी पोलीस प्रशासन, वीज मंडळ, महानगरपालिका इस्टेट विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, दूरसंचार, पुजारी ,नवरात्रात वेगवेगळ्या सेवा देणारे सेवेकरी, सुरक्षा पुरवणारे संस्था यांच्या समवेत वेगवेगळ्या बैठका घेण्यात आल्या.
पोलीस प्रशासनाचे वतीने जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव,वहातुक निरिक्षक वसंत बाबर ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे प्रसाद संकपाळ देवस्थान सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव,उपसचिव शीतल इंगवले, अभियंता सुदेश देशपांडे, सुयश पाटील, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, मिलिंद घेवारी तसेच दूरसंचारचे अधिकारी, वीजमंडळाचे अधिकारी,महानगरपालिका इस्टेट विभागाचे अधिकारी, पुजारी प्रतिनिधी, सेवेकरी उपस्थित होते.