उदगाव : नांदणी (ता.शिरोळ) येथे पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवात मंगळवारी श्री १००८ भ. आदिनाथ तीर्थंकर आणि श्री १००८ भ. मुनिसुव्रतनाथ तीर्थंकरांच्या वर अभिषेक ३३६ कलशद्वारे प्रथम अभिषेक करण्यात आला. यामध्ये जल, इक्षुरस, सर्वोधषधी, हळद, चंदन, कुंकुम व अष्टद्रव्यांच्या अभिषेक आणि भगवंतांच्या मूर्तीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो श्रावक - श्राविका उपस्थित होते.नांदणी येथे गेल्या सहा दिवसांपासून पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव सुरू आहे. मंगळवारी महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ झाला. प्रारंभी प्रथम अभिषेक करण्याचा मान संजय बोरगावे यांच्या परिवाराला मिळाला. जल, इक्षुरस, सर्वोधषधी, हळद, चंदन, कुंकुम व अष्टद्रव्यांच्या अभिषेक करण्यात आला. हिरक कलश, सुवर्ण कलश, रजत कलश अभिषेक इंद्रजीत गांधी, रचित भगाटे, चंद्रकांत धुळासावंत, बाहुबली चौगुले, विनोद पाटील, श्रीमंधर गांधी, मनोज चौगुले, कल्पना होरे, इंद्रजीत गांधी यांनी अभिषेक केला, तसेच हेलिकॉप्टरमधून श्री १००८ भ. आदिनाथ तीर्थंकर व श्री १००८ भ. मुनिसुव्रतनाथ तीर्थंकरांच्या वर मूर्तीवर पुष्पवृष्टी नीलेश टारे, नीलेश भगाटे, राजू पाटील - सावंत्रे, स्वप्निल देसाई यांनी केला.दरम्यान, सकाळी नित्यविधी, लघुशांतिक, आचारश्रींचे प्रवचन, भक्तांमर विधान झाले. रात्री धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी प.पू. श्री १०८ आचार्य विशुद्धसागरजी महाराज, जगद्गुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, चारकीर्ती भट्टारक महास्वामी श्रवणबेळगोळ, देवेंद्रकीर्ती भट्टारक महास्वामी हुमचा, लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी ज्वालामालिनी, आमदार विश्वजीत कदम, कर्नाटकचे माजी मंत्री श्रीमंतकाका पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, उत्तम पाटील, अभिनंदन पाटील, सावकार मादनाईक, रावसाहेब पाटील, उद्योगपती राजू पाटील यांच्यासह मुनी संघ व लाखो श्रावक - श्राविका उपस्थित होते.आज, बुधवारी भगवंत निर्वाण कल्याण होणार आहे, तसेच श्री १००८ भ. आदिनाथ तीर्थंकर आणि श्री १००८ भ. मुनिसुव्रतनाथ तीर्थंकरांच्यावर महामस्तकाभिषेक, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी व रात्री श्री विहार रथोत्सव मिरवणूक होणार आहे..
Kolhapur: नांदणी येथे भगवंतांच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 15:48 IST