कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यात शौचालय अनुदानात घोटाळा झाल्याची तक्रार करूनही चौकशी होत नसल्याने ‘स्वाभिमानी’चे पंचायत समिती सदस्य प्रवीण जनगोंडा आणि यांनी अर्धनग्न अवस्थेत शुक्रवारी जिल्हा परिषदेत आंदोलन केले. यावेळी त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. अखेर २१ डिसेंबर २०२० पर्यंत चौकशी पूर्ण करण्याची ग्वाही देण्यात आली.
जनगोंडा यांनी याबाबत याआधीच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला निवेदन दिले होते. या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा त्यांचा आरोप आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन हातकणंगले गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले होते; परंतु त्यांच्यावरच आरोप असल्याने त्यांनी चौकशीस नकार दिला. अखेर शिरोळच्या गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
या दरम्यान काही कालावधी गेल्याने जनगोंडा यांनी गुरुवारी (दि. १०) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वीय साहाय्यकांची भेट घेऊन आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट केले होते. शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास जनगोंडा आणि महेश पांडव पहिल्या मजल्यावर आले. सीईओ केबिनकडे जाणाऱ्या पोर्चमध्ये त्यांनी बैठक मारली. अचानक त्यांनी शर्ट काढले. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सुहास पोवार यांनी त्यांना सुरुवातीला समजावून सांगितले. तुम्ही कपडे घालून बसा असे सांगितले. मात्र हे दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
अखेर त्यांना ओढतच खाली नेण्यात आले. यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांच्या दालनामध्ये बैठक घेण्यात आली. तातडीने शिरोळच्या गटविकास अधिकाऱ्यांना सांगून २१ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत अहवाल पाहिजे असे सांगितले. यानंतर आंदोलकांना तसे लेखी पत्र देण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे उपस्थित होत्या.
चौकट
बघ्यांची गर्दी
पहिल्या मजल्यावरील आरडाओरडा ऐकून कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेत आलेले नागरिक या ठिकाणी जमा झाले होते. ‘आशां’चा रास्ता रोको, दिव्यांगांचे आंदोलन, पट्टणकोडोलीचा घागर मोर्चा यांमुळे सध्या जिल्हा परिषदेसमोरील सध्याचे वातावरण तापलेले आहे.
१११२२०२० कोल झेडपी ०१
हातकणंगले पंचायत समितीचे सदस्य प्रवीण जनगोंडा यांनी शुक्रवारी कपडे काढून जिल्हा परिषदेत आंदोलन केले.