कोल्हापूर : पंचगंगा नदी व रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजना तकलादू व निष्प्रभ असल्याचे बुधवारी पुन्हा स्पष्ट झाले. महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व प्रजासत्ताक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त पाहणीवेळी ही बाब निदर्शनास आली. याचा पंचनामा केला असून, मनपा प्रशासनाला सक्त सूचना दिल्या. प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केलेल्या तोंडी तक्रारीवरून बुधवारी ही संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीत मनपाचे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, उपजल अभियंता एस. बी. कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता निवास पवार, पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एन. डी. मोरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी डॉ. राजेश औटी, प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनी भाग घेतला. जयंती नाला अडवण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्यावरून काळसर रंगाचे फेसाळयुक्त सांडपाणी ओव्हरफ्लो होत असल्याचे, तसेच सांडपाण्यात नागरी घनकचरा, प्लास्टिक, आदी मिसळत असल्याचेही आढळून आले. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ब्लिचिंगचा डोस देण्यात येत होता. तसेच क्लोरिनेशन प्रक्रिया देखील तात्पुरत्या स्वरूपाची होती. जयंती नाल्यावर असलेल्या पंपिंग स्टेशनवरील ४५० एचपीचे दोन पंप सुरू होते. रंकाळा तलावात सुद्धा अशाच प्रकारे शाम हौसिंग सोसायटीजवळील नाल्याचे सांडपाणी मिसळत होते. त्यामुळे मिसळत असणाऱ्या सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून, ते चिपळूण येथील प्रादेशिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांडपाणी ओव्हरफ्लो होण्याचा प्रकार पावसामुळे होत असल्याचा खुलासा केला आहे. तरीही योग्य त्या उपाययोजना व खबरदारी घेण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी)
पंचगंगा, रंकाळ्यात सांडपाणी जाणे सुरूच
By admin | Published: June 18, 2015 12:25 AM