: पाण्याला दुर्गंधी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कुरुंदवाड : इचलकरंजी नगरपालिकेचा सांडपाणी प्रकल्प (सीईटीपी) गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शहरातील मलमिश्रीत सांडपाणी थेट नदीपात्रात येत असल्याने नदीतील पाणी पूर्णपणे दूषित बनले असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे.
दरम्यान, स्वाभिमानी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील दूषित पाण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबट पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पाहणी केली. नदीपात्रात जलपर्णी असल्याने पाटील यांनी विद्युत मोटार सुरु करुन नदीपात्रातील पाण्याचे नमुने घेण्यास भाग पाडले.
इचलकरंजी शहरातील तसेच औद्योगिकीकरणाचे सांडपाणी थेट पंचगंगा नदीपात्रात सोडले जात असल्याने शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठच्या नागरिकांना वारंवार दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र बंद असल्याने मलयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळले जात आहे. नदीपात्र जलपर्णीने व्यापले असल्याने दूषित पाणी प्रत्यक्षात दिसत नसले तरी नदीकाठावर दुर्गंधी पसरली आहे. शिवाय नदीतील पाणी उपसा केल्यानंतर पांढरे फेसाळलेले पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
...........
कडक कारवाई करण्याची मागणी
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी हरबट यांनी नदीपात्राची पाहणी करुन पाणी तपासणीसाठी घेतले असले तरी कागदोपत्री कारवाईचा खेळ करण्यापेक्षा नदी प्रदूषण करणाऱ्या घटकावर कडक कारवाई करावी जेणेकरुन नदी प्रदूषणातून नागरिकांच्या जीवाशी पुन्हा खेळ खेळणार नाही, अशी मागणी पंचगंगा काठच्या नागरिकांतून होत आहे. तर स्वाभिमानीचे बंडू पाटील यांनी क्षेत्र अधिकारी हरबट यांना लेखी निवेदन देऊन नदी प्रदूषण प्रकरणी इचलकरंजी मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
फोटो - २६०३२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - पंचगंगा नदीतील पाणी विद्युत पंपाच्या सहाय्याने उपसा करुन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबट यांनी पाणी पृथ्थकरणासाठी घेतले. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे बंडू पाटील उपस्थित होते.