कोल्हापूर : पंचगंगेच्या प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या संबंधित घटकांवर खटले भरावेत, अशी मागणी प्रजासत्ताक संघटनेने विभागीय आयुक्तांकडे गुरुवारी केली. बुधवारी महानगरपालिकेच्या टॅँकरमधून जयंती नाल्यात मैला सोडला जात असताना महापालिका कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे दिलीप देसाई यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पंचनामा केला आणि महापालिकेला नोटीस पाठविली; परंतु गुरुवारीही दिवसभर जयंती नाल्यातील सांडपाणी थेट नदीत मिसळत होते. ते रोखण्याचे कसलेही प्रयत्न महापालिका यंत्रणेने केले नाहीत. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीकडेही दुर्लक्ष केल्याचे दिसते. महानगरपालिका तसेच शासकीय पातळीवर कोणतीच खबरदारी घेतली जात नसल्यामुळे प्रजासत्ताक संघटनेने गुरुवारी थेट विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांच्याकडे तक्रार केली असून, पंचगंगा प्रदूषणावर मॉनेटरिंग करणाऱ्या समितीला या गंभीर विषयावर चर्चा करण्यास अद्याप वेळ मिळाला नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. प्रदूषण करणाऱ्यांना मोकाट सोडले जात आहे. ते रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत, असे तक्रारीत म्हटले आहे. प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर फौजदारी कारवाई करून खटले भरावेत, अशी मागणीही तक्रार अर्जात केली आहे. जर प्रदूषण रोखले गेले नाही व जलजन्य आजारांची साथ पसरून मनुष्यहानी झाली तर त्याची जबाबदारी प्रदूषण रोखण्याकडे दुुर्लक्ष करणाऱ्यांवर राहील, असा इशाराही संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)बैठक झालीच नाही; ‘जयंती’चे सांडपाणी पुन्हा थेट नदीतपंचगंगा नदीत मिसळणाऱ्या जयंती नाल्यात मैला सोेडण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही त्याचा पंचनामा करण्यापलीकडे शासकीय यंत्रणेने कोणतीही कारवाई केली नसल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.या प्रश्नावर गुरुवारी संयुक्त बैठक घेण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगूनही तशी बैठक झाली नाही. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व मंडळाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यास विनंती करण्याचे आश्वासन प्रादेशिक अधिकारी एन. एच. शिवांगी यांनी दिले होते; परंतु बैठकच झाली नाही. के वळ शिवांगी यांच्यासह उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रदूषणाबाबत माहिती दिली.
पंचगंगा प्रदूषणप्रश्नी खटले भरावेत
By admin | Published: June 05, 2015 12:27 AM