इचलकरंजी येथील वस्त्रोद्योग व शहराच्या विकासात परिसरातील गावांचेही महत्त्वाचे योगदान आहे. या गावांमधील समस्याही गेली कित्येक वर्षे तशाच आहेत. शासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या समस्या सोडवाव्यात, यासाठी परिसरातील गावांची समस्या मांडणारी मालिका आजपासून...अतुल आंबी -- इचलकरंजीचंदूर (ता. हातकणंगले) येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. देशभर प्रगतीचे वारे वाहत असले तरी आजतागायत चंदूर गावातील नागरिकांना पंचगंगा नदीचे मैलामिश्रित व प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया थेट प्यावे लागत आहे. पंचगंगा नदीवर पूल नसल्याने दळण-वळणाची समस्या, तसेच सांडपाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. शासन व लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.चंदूर गावासाठी चार वर्षांपूर्वी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची भारत निर्माण नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. चार वर्षांत या योजनेचे पाणी फक्त गावच्या वाढीव वसाहतीत पोहोचविण्यात यश आले आहे. या योजनेंतर्गत पंचगंगा नदीकाठावर बांधण्यात आलेले जॅकवेलही वीज पुरवठा न मिळाल्याने अद्याप सुरू झाले नाही. दोन वर्षांपासून सहा महिन्यांत संपूर्ण गावाला शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी घोषणा ग्रामपंचायतीच्यावतीने केली जात असली तरी आजही संपूर्ण गावाला शुद्ध पाणी मिळाले नाही. नागरिकांना पंचगंगेतील प्रदूषित पाणीच विनाप्रक्रिया थेट प्यावे लागत आहे.त्याचबरोबर गावाच्या पश्चिम-दक्षिण बाजूकडे असलेल्या पंचगंगा नदीवर वाहतुकीसाठी पूल नसल्याने चंदूर ‘डेड एंड’ मानला जातो. त्यामुळे एस.टी. महामंडळाचे नेहमीच गावाकडे दुर्लक्ष असते. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी निर्णय घेत दहा वर्षांपूर्वीच अवैध वाहतूक (वडाप) बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावातील नागरिकांसह पै-पाहुण्यांना ये-जा करण्यासाठी एस.टी.शिवाय पर्याय राहिला नाही. मात्र, इचलकरंजी आगाराकडून कर्मचाऱ्यांची व वाहनांची कमतरता असल्याचे कारण पुढे करून गावासाठी नियोजित केलेल्या अठरा फेऱ्याही वेळेवर पूर्ण केल्या जात नाहीत. त्यामुळे इचलकरंजी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस न मिळाल्याने अनेकवेळा शैक्षणिक नुकसान होते, तर अनेकांना बसस्थानकावर दोन-दोन तास बसून रहावे लागते. तसेच चंदूर-इंगळी पुलाचे प्रलंबित असलेले कामही पूर्ण झाल्यास दळण-वळणाचा मार्ग सोयीस्कर होऊन वाहतुकीची समस्या मिटण्याबरोबरच हुपरी, पट्टणकोडोली, कोल्हापूरकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग निर्माण होणार आहे.बसस्थानकच नाहीविशेष म्हणजे वडाप बंद असलेल्या चंदूर गावामध्ये बसस्थानकच नाही. त्यामुुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महिला व विद्यार्थिनींना बसस्थानक चौकातील दुकानांच्या दारात पायऱ्यांवर थांबावे लागते. पावसाळ्यात तर थांबायला जागा नसल्यामुळे जास्तच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने बसस्थानक बांधावे, अशी मागणी होत आहे.
पंचगंगा उशाला...पण दूषित पाणीच घशाला
By admin | Published: September 21, 2015 10:38 PM