कोल्हापूर : पंचगंगा नदी घाट विकासाचे सुरू झालेल्या कामाच्याबाबतीत कोणाच्या तक्रारी होत्या माहिती नाही, परंतु हेरिटेज कमिटीच्या बैठकीनंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने काम थांबविण्याच्या सूचना दिल्या, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांनी नागरी कृती समितीच्या सदस्यांना दिली. पुरातत्व विभागाकडे त्यांच्या सूचनेनुसार या कामाचा पाठविलेला फेरप्रस्तावदेखील प्रलंबित आहे, असेही त्यांनी सांगितले.नदी घाट विकसित करण्याचे काम थांबविण्यात आले असून त्याची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी नागरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कार्यकारी अभियंता सोनवणे, उपकार्यकारी अभियंता धनंजय भोसले, आर्किटेक्चर इंदजित नागेशकर यांची भेट घेतली. त्यावेळी चर्चेत ही माहिती देण्यात आली.
नदी घाट परिसर छत्रपती ट्रस्टच्या मालकीचा असल्याने महाराजांची तसेच पुरातत्व विभागाची परवानगी घेण्यात आली होती. परवानगी घेताना हा परिसर ब्रम्हपुरी टेकडीपासून शंभर मीटर अंतराच्या बाहेर असल्याचे पटवून देऊनच कार्यवाही करण्यात आली. या ठिकाणी कोणतेही खुदाईचे काम होणार नव्हते. केवळ लँडस्केपिंग, पदपथासह दगडी भिंत घातली जाणार होती, असे नागेशकर यांनी सांगितले.हेरिटेज कमिटीची २ नोव्हेंबर २०१८ रोजी बैठक झाली. त्यामध्ये काही तक्रारी झाल्यानंतर नगररचना सहायक संचालकांनी २२ नोव्हेंबरला पत्र पाठवून काम थांबविण्याचे आदेश दिले. तसेच पुरातत्व विभागाच्या कोल्हापूर येथील विजय चव्हाण यांनी फोनवर काम थांबवा अन्यथा गुन्हे दाखल करू असे सांगितले. पण त्यांनी लेखी काहीच दिले नाही, असे धनंजय भोसले यांनी सांगितले.