इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीत जलपर्णी विविध सामाजिक संस्थांच्या योगदानातून काढण्यात आल्याने पंचगंगा नदीने मोकळा श्वास घेतला. पंचगंगा नदीपात्रात प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली होती. लांबून एखाद्या क्रीडांगणाप्रमाणे हे दृश्य दिसत होते. जलपर्णीमुळे जलचर प्राण्यांनाही मोठे नुकसान झाले. पै. अमृत भोसले युवा शक्तीच्यावतीने व्यंकोबा मैदानातील पैलवानांना सोबत घेऊन जलपर्णी हटाव मोहीम सुरू केली. त्यानंतर वरद-विनायक बोट क्लबनेही योगदान दिले. त्यापाठोपाठ जयहिंद वाघाचे मंडळ, माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, रमाकांत जाधव, इचलकरंजी नागरिक मंच, इलेक्ट्रिकल असोसिएशन, परीट समाज, श्रीमंत शाहूनगर गणेशोत्सव मंडळ, बालगोपाळ मंडळ आदींनी सहभाग घेतल्याने या मोहिमेला व्यापक स्वरुप प्राप्त होऊन पंचगंगा जलपर्णीमुक्त झाली. नगरपालिकेच्या विजय पाटील व संजय कांबळे तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
०४०३२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीतील पंचगंगा नदी विविध सामाजिक संघटनांच्या योगदानातून जलपर्णीमुक्त बनली.