कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दिवसभर संततधार, तर धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून रविवारी रात्री उशिरा पंचगंगेने इशारा पातळी (३९ फूट) ओलांडून धोका (४३ फूट) पातळीकडे आगेकूच सुरू ठेवली आहे. नदीकाठच्या आंबेवाडी, प्रयाग चिखली आदी गावांचे स्थलांतर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. हवामान विभागाने आगामी तीन दिवस ‘यलो’ अलर्ट दिल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.शनिवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा व चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात तब्बल १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. संततधार सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अलमट्टीमधून विसर्ग वाढवल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. तरीही रविवारी रात्री उशिरा ३९ फुटांच्या वर गेल्याने पाडळी बु्द्रूक, आंबेवाडी, प्रयाग चिखली आदी नदी गावांचे स्थलांतर सुरू केले आहे.
रेड अलर्ट; पण पाऊस जेमतेमचभारतीय हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी रविवारी रेड अलर्ट दिला होता. मात्र, प्रत्यक्षात पाऊस जेमतेमच होता.
धामणी परिसरातील गावांना बेटाचे स्वरूपगोठे, आकुर्डे, तांदुळवाडी, पणुत्रे, निवाचीवाडी, गवशी, हारपवडे या धामणी खोऱ्यातील गावांना पुराच्या पाण्यामुळे बेटाचे स्वरूप आले आहे.
एसटीचे नऊ मार्ग पूर्णपणे बंदएसटी महामंडळाच्या बसची नऊ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. इतर ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील २५ मार्गांवरील वाहतूक ठप्पजिल्ह्यातील इतर जिल्हा मार्ग ११, तर ग्रामीण मार्ग १४, अशा २५ मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्याशिवाय सहा राज्य मार्गही पाण्याखाली गेले आहेत.
पंचगंगेचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंतपंचगंगेचे पाणी रविवारी दुपारी गायकवाड वाड्याजवळ पोहोचले आहे. त्यामुळे गंगावेश ते शिवाजी पुलापर्यंतची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
‘राधानगरी’ ८५; ‘वारणा’ ७४ टक्के भरले‘राधानगरी’ धरण ८५ टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेकंद १४०० घनफूट पाणी वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर वारणा धरण ७४ टक्के भरले असून, त्यातून ९१६, कासारीमधून ५००, घटप्रभामधून ३९९३, तर कोदे धरणातून १६९६ घनफूट पाणी सोडण्यात आल्याने नद्यांची पातळी वाढत आहे. ‘राधानगरी’ पूर्ण क्षमतेने भरले तर महापुराचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.