कोल्हापूर : श्रावण महिना संपला तरी अजून ऊन-पावसाचा खेळ सुरुच आहे. एकदम जोराची सर येते, क्षणात ऊनही पडत असल्याने महापुराचे दाटलेले मळभही दूर होऊ लागले आहे. गणेशोत्सवाच्या तयारीलाही त्यामुळे जोर चढला आहे.
दरम्यान, पावसाच्या उघडिपीमुळे नद्यांची पाणीपातळी कमी होत असली तरी अजूनही त्या पात्राबाहेरच आहेत. पंचगंगेची पाणीपातळी राजाराम एक फुटांनी उतरली आहे. पाणी उतरण्याचा वेग संथ असल्याने पाणाखाली असलेली नदीकाठची पिके कुजू लागली आहेत. अजूनही ६४ बंधारे पाण्याखालीच असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. राधानगरी धरणाचे विसर्ग सुरू असलेले दोन दरवाजे बंद झाले.श्रावणात ऊन-पावसाचा खेळ हमखास रंगतो. यावर्षी मात्र तो संपल्यानंतर सुरू झाला आहे. श्रावण सुरू झाला तेव्हा पावसाने ओढ दिली होती. मध्यावर आल्याने पावसाचा जोर वाढला आणि पूरस्थिती निर्माण झाली. मागील आठ-दहा दिवस पाऊस सुरू आहे.
बुधवारपासून मात्र काहीशी उघडीप दिली आहे. मात्र, श्रावणासारखा ऊन-पावसाचा खेळ मात्र कायम राहिला आहे. गुरुवारी दिवसभर जिल्हाभर असेच वातावरण होते. अचानक ढग भरून येत होते, जोरदार पाऊस पडत होता आणि लगेच अवघ्या काही मिनिटांत ऊनही पडत होते.जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत पर्जन्यमापकावर १३१ मि.मी. पाऊस नोंदविला गेला आहे. बुधवारी हेच प्रमाण ३११ मि.मी. इतके होते. गगनबावड्यात ३५ मि.मी. पाऊस झाला आहे, तर शिरोळमध्ये एक थेंबही पडलेला नाही. राधानगरी, शाहूवाडी, आजरा, चंदगड, भुदरगडमध्ये १० ते १८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. उर्वरीत तालुक्यात २ ते ७ मि.मी. पाऊस झाला आहे.पंचगंगा ४०.३ फुटांवर३९ फुटांची इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करणारी पंचगंगा आता संथ झाली आहे. महापुराचे संकट टळले असून ती आता ४०.३ फुटांवरून वाहत आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ बुधवारी ४१.३ फूट असणारी पातळी गुरुवारी ४०.३ फुटांपर्यंत खाली आली. अलमट्टीतून २ लाख ५२ हजार ९२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग कायम आहे.