पंचगंगा नदीला महापूर आला आणि नागरी वस्तीत महापुराचे पाणी शिरले की मग सर्वांनाच पंचगंगेच्या पूररेषेची आठवण होते. त्यावर चर्चा होते. महापूर ओसरला की, मग हळूहळू या विषयावरील चर्चाही ओसरते. गेले अनेक वर्षांचा हा अनुभव आहे. सन २०१९ ला महापूर आला, तेव्हापासून शहर हद्दीतील पूररेषा पुन्हा एकदा चर्चेत आली. पंधरा दिवस महापुराचे पाणी शहराच्या चाळीस टक्के भागात राहिल्याने पूररेषेचे गांभीर्य सर्वांनाच पटले. त्यामुळे या महापुराच्या कटु आठवणी लक्षात घेऊन पूररेषेचे काम सुरू झाले, पण ते शहर हद्दीत अर्धवटच राहिले. कोरोना संसर्ग सुरू झाल्यामुळे काम थांबल्याचे सांगण्यात येते.
२०२१ चा महापूर तर मागच्या दोन वर्षांपूर्वीपेक्षा अधिक होता. हा पूर चार दिवसांत ओसरला तरी त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आता पूररेषेचे महत्त्व अधिक गडद झाले. यासंदर्भात नुकतीच पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होऊन २०१९ ऐवजी आता २०२१ च्या महापुराची पातळी लक्षात घेऊन पूररेषा निश्चित करण्याचे ठरले. त्यानुसार काम सुरू होऊन महापुराचे पाणी आलेल्या परिसरातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पुढील दोन महिन्यांत काम पूर्ण होईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
कोल्हापूर विभागाने सध्या पंचगंगा नदी शहराच्या ज्या भागातून वाहते, त्या भागातील पूररेषा निश्चित करण्यास प्राधान्य दिले आहे. उर्वरित काम नंतर टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. शहरातील पूररेषा निश्चितीकरण झाले की, आयआयटी, मुंबई या संस्थेच्या तज्ज्ञाकडून तपासून घेऊन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे अहवाल पाठविला जाईल. मुख्य अभियंता स्तरावर त्याचा अंतिम निर्णय होईल.
पॉईंटर -
- पंचगंगा नदीची उगमापासून संगमापर्यंत लांबी - ८१ किलोमीटर
- कोल्हापूर शहर हद्दीतील नदीची लांबी - १९ किलोमीटर
- सर्वेक्षण झालेली नदीची लांबी - १४ किलोमीटर
- सर्वेक्षण राहिलेली नदीची लांबी - ५ किलोमीटर.
( शिंगणापूर ते शिवाजी पूल व जाधववाडी, कदमवाडी, भोसलेवाडी काम बाकी)
-महापूर पातळी अशी आहे-
- २०१९ चा महापूर - पातळी ५५ फूट ७ इंच
- २०२१ चा महापूर - पातळी ५६ फूट ३ इंच
कोट -
प्राधान्यक्रमाने पंचगंगा नदीची कोल्हापूर शहर हद्दीतील पूररेषा निश्चित करण्याचे काम हाती घेतले आहे. २०१९ च्या पूरपातळीनुसार सर्वेक्षणाचे काम झाले होते, आता २०२१ ची पूरपातळी विचारात घेऊन सुधारित सर्वेक्षणाचे काम अंतिम केले जात आहे.
महेश सुर्वे, अधीक्षक अभियंता.
जलसंपदा विभाग कोल्हापूर.
कशी ठरविली जाते पूररेषा ?
जलसंपदा विभागातर्फे शंभर वर्षांतील पावसाच्या नोंदी, तसेच महापुराची महत्तम पातळी विचारात घेतली जाते. शास्त्रीय पद्धतीने संख्याशास्त्र, तसेच अभियांत्रिक शास्त्राचा आधार घेऊन पूररेषा निश्चित केली जाते. त्याची पडताळणी आयआयटीसारख्या संस्थेकडून करून घेतली जाते. त्यांच्या सूचनांचा विचार करून पूररेषा अंतिम केली जाते. ही पूररेषा निळ्या, तांबड्या व हिरव्या रेषेने दाखविली जाते.