कोल्हापूर : शहरात आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरुच आहे. राधानगरी धरणातून विसर्ग सुरु असल्याने भोगावती नदीपात्रासह पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ४१ʼ२'' फुटावर गेली आहे. तर कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पुराचे पाणी येवू लागले आहे. पाणी पातळीत वाढ झाली तर आज हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ७१ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी रात्रभर पावसाचा जोर कायम होता. गुरुवारी पहाटेपासून दिवसभरही संततधार पाऊस राहिला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. गगनबावडा येथील मांडुकली या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने गगनबावडा ते साळवण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद होण्याची शक्यताकासारी नदीचा उगम शाहूवाडी तालुक्यात होऊन पन्हाळा पश्चिम भागातून मार्ग काढत करवीर प्रयाग येथे मिळते. कासारी नदीला पूर आल्याने नदीचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केर्ली गावाजवळ सकाळी पाणी आले. पावसाचा जोर सध्या कमी झाला असला तरी पश्चिम बाजूस पावसाचा जोर वाढल्यास नदीची पाणी पातळी वाढून कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद होऊ शकतो. सध्या पाणी पातळी कमी असल्याने वाहतुक सुरू आहे.
राधानगरी धरणातून ८ हजार ५४० क्यूसेकने विसर्गराधानगरी धरणाचे तीन, चार, पाच, सहा, सात हे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यामुळे धरणातून ८ हजार ५४० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. घटप्रभा, जांबरे प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे. सर्वच धरणातील पाणीसाठा ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.आलमट्टी ७२ टक्के भरलेकर्नाटकातील आलमट्टी धरणात गेल्या चोवीस तासांत ८५ हजार क्यूसेेक पाण्याची आवक होत आहे. धरण ७२.४२ टक्के भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही तरीही धरणातून एक लाख २५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
तालुकानिहाय पाऊसजिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय असा : हातकणंगले : १७.५, शिरोळ : २४.४, पन्हाळा : ३६.१, शाहूवाडी : ५७.१, राधानगरी : ४३.३, गगनबावडा :११६.२, करवीर : २०, कागल : १८.६, गडहिंग्लज : २९, भुदरगड : ५५.१, आजरा : ४९.६, चंदगड : ३७.२.प्रमुख धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये असा :धरण -क्षमता -पाणीसाठाराधानगरी - ८.३० - ८.३६१तुळशी - १.९१- ३.४७१वारणा -२८.९३- ३४.३९९दुधगंगा- १४.९२- २५.३९३कासारी- २.२८-२.७७४घटप्रभा - १.५६- १.५६०