कोल्हापूर : पूरमुक्त कोल्हापूर होण्यासाठी पंचगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासह या नदीपात्रातील जमिनीची होणारी धूप थांबविणे आवश्यक आहे; त्यासाठी नदीपात्रालगत, त्याच्यामागे असणाऱ्या शेती, परिसरात झाडे लावणे, असलेले गवत टिकविण्याचे काम लोकांकडून व्हावे. नाला म्हणून ओळख झालेली जयंती, गोमतीला नदीचा दर्जा देण्यात यावा, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी बुधवारी केले.शिवाजी विद्यापीठ आणि असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अॅन्ड इंजिनिअर्स कोल्हापूरतर्फे ‘जागे व्हा, पंचगंगेसाठी’ या अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातील या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. राणा म्हणाले, कोल्हापूरमधील जलस्रोत, नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सुरूअसलेले काम पाहून आनंद झाला. गेल्या काही वर्षांतील चुकांमुळे जयंती, गोमती नदीची नाला नोंद म्हणून झाली आहे. ती पुन्हा नदी म्हणून होण्यासाठी आयुक्त कलशेट्टी यांनी प्रयत्न करावेत. जयंती, गोमतीमध्ये ज्या ठिकाणी सांडपाणी मिसळते, त्या ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारल्यास पाणी शुद्धीकरण प्रक्रियेचा खर्च शंभरपटीने कमी होईल.
विद्यापीठ परिसरात पडणारा पाऊस, या ठिकाणी असणारी पाण्याची गरज लक्षात घेऊन जलव्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार पाऊल टाकल्याने आज विद्यापीठ पाणीदार झाले आहे. पिण्याचे आणि वापराचे पाणी स्वतंत्रपणे ठेवण्याचे चांगले व्यवस्थापन विद्यापीठाकडून होते. दर्जा, वापरानुसार पाणी स्वतंत्र ठेवल्यास त्यांच्या शुद्धीकरणासाठी कमी खर्च येतो. विद्यापीठाने महाविद्यालयांमध्ये जलसाक्षरता उपक्रम राबवावा.आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील एनएनएसचे काम खूप चांगले आहे. जलसाक्षरतेसह लॅब टू लँड काम होणे आवश्यक आहे. ‘सागरमित्र’चे संस्थापक विनोद बोधनकर म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. राणा यांच्या मार्गदर्शन, प्रेरणेतून विद्यापीठाने जलव्यवस्थापन केले आहे. जलसाक्षरतेचा उपक्रम राबविला जाईल. या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डी. आर. मोरे, जयदीप बागी, उदय गायकवाड, गौरी चोरगे, अनिल कानडी, आदी उपस्थित होते. पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी स्वागत केले. असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूरचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी प्रास्ताविक केले. आरती परीट, आसावरी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. वंदना कुसाळकर यांनी आभार मानले.