काेल्हापूर : यंदा आलेल्या महापुराचा सर्वात जास्त फटका बसलेल्या कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यातील घरांच्या पडझडीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सोमवारपासून सुरू झाले. अनेक घरे व शेतात अजून पाणी आहे त्यामुळे पाणी उतरेल त्या प्रमाणे पंचनामे केले जाणार असून त्यासाठी ३२ पथकांमध्ये १७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पुढील आठ दिवसात सर्व प्रकारचे पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.कोल्हापुरात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात पहिला फटका करवीर तालुक्याला बसतो. येथील चिखली, आंबेवाडी, आरे सह विविध गावे कमी अधिक प्रमाणात पुराच्या पाण्यात बुडतात. त्यामुळे घरांची पडझड, शेतीत पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान, जनावरांच्या गोठ्याची पडझड असे विविध प्रकारचे नुकसान महापुराने झाले आहेत. कोल्हापूर शहरातदेखील सुतारवाडा, जामदार क्लब, नागाळा पार्क, व्हिनस कॉर्नर सारख्या भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने पंचगंगेची पाणी पातळीदेखील कमी होत आहे. त्यामुळे ज्या ज्या भागातील पाणी ओसरू लागले आहे, त्या त्या भागांमध्ये सोमवारपासून तातडीने पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.प्रत्येक पथकामध्ये एक तलाठी, महापालिकेचे तीन ते चार कर्मचारी, आयटीआय विभागातील एक कर्मचारी अशा पाच ते सहा जणांचा समावेश आहे. पंचनाम्यांसाठी १७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी टीम पाठवली आहे. अजूनही शेतांमध्ये तसेच गावांमध्ये पाणी आहे, त्यामुळे पावसामुळे ज्या घरांची किंवा मिळकतींची पडझड झाली आहे त्यांचेच पंचनामे केले जात आहेत.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण..पुरबाधितांच्या थेट खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम पाठवली जाणार आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या फॉरमॅट मध्येच पंचनामे होणे अपेक्षित आहेत. हे पंचनामे कसे करावेत याचे प्रशिक्षण सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात देण्यात आले. करवीरचे प्रांताधिकारी हरिश धार्मिक, तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
पंचनाम्यांचे स्वरुप असे..पंचनाम्याच्या एक्सेल शीटमध्ये मिळकत क्रमांक, मोबाइल, आधार क्रमांक, घर मालकाचे नाव, पत्ता, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, या सर्वांचे पुरावे, घरात पाणी असल्याचा दिनांक, दिवस, नुकसानीचा कालावधी अशी माहिती भरायची आहे. शिवाय मिळकतधारकांचे स्वयंघोषणापत्र जोडायचे आहे. व्यावसायिक पंचनाम्यांमध्ये संयंत्राचे नुकसानीची अंदाजीत रक्कम, कच्च्या तसेच तयार मालाच्या नुकसानीची अंदाजित रक्कम, नुकसानीचे स्वरुप व रक्कम व स्वयंघोषणापत्र अशी माहिती देणे गरजेचे आहे. शिवाय सोबत जीओ टॅगिंग करायचे आहे.