श्रीकांत ऱ्हायकर
कोल्हापूर - मनामध्ये सावळ्या विठ्ठलाची आस, मुखामधे हारिनामाचा गजर, सोबतीला टाळमृदंगाचा गजर व खांद्यावर भगवी पताका डोईवर घेऊन ग्याण्बा तुकारामचा जयघोष करत भक्तीमय वातावरणात आज चांदे (ता. राधानगरी) येथील दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या दिंडीत जवळपासच्या चाळीस वाडया वस्त्यातील १५० वारकरी सहभागी झाले आहेत.
चांदे येथील या दिंडीला जवळपास २०० वर्षाची परंपरा आहे. प्रत्येक वर्षी अखंडीतपणे माघवारीसाठी येथून दिंडीचे प्रस्थान होते. महिणाभराच्या पायी प्रवासानंतर ही दिंडी पंढरपूरमध्ये पोहचते. तत्पुर्वी चांदे येथील मुकूंद महाराजांच्या समाधिला आभिषेक करून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते. या दिंडीचे मालक माऊली महाराज चांदेकर यांच्या व्यवस्थापणाखाली या दिंडीची परंपरा सद्या अखंडीतपणे सुरू आहे. पायी दिंडीची इतक्या वर्षाची परंपरा असणारी ही जिल्हयातील एकमेव दिंडी आहे.
ब्रम्हीभूत मुकंद महाराजांच्या पाचव्या पिढीतील त्यांचे वंशज त्यांनी घालून दिलेल्या या पायी दिंडीची परंपरा चालवत आहेत. या संपूर्ण दिंडी सोहळ्यामध्ये सामील होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना प्रेम भावनेने सांभळण्याचे काम मुकुंदजांचे वंशज करत आहेत. अवघ्या चार वारकऱ्यांपासून सुरू केलेल्या या पायी दिंडीच्या सोहळ्यात सद्या पंढरपूरपर्यंत शेकडो वारकरी सहभागी होत असल्याचे दिंडी मालक मुकुंद महाराजांचे म्हणणे आहे . पंढरपुरमध्ये माघ एकादशी दिवशी नगर प्रदक्षिनेचा मान या दिंडीला असतो . शिवाय वास्कर महाराजांच्या फडामध्ये ही या दिंडीला मान आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता चांदे येथील मुकूंद महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तेथील धार्मिक कार्यक्रमांची सांगता होऊन जवळपास २०० वारकऱ्यांसह ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली . यावेळी दिंडीचे मालक माऊली महाराज चांदेकर व संपूर्ण सोनवले कुटुंबीय या सोहळ्याच्या ठिकाणी हजर होते . चांदे पंचक्रोशीतील ग्रामस्तांनी भक्तीमय वातावरणात दिंडीला निरोप दिला .