(फोटो -१६०३२०२१-कोल-चेतन नरके व अजित नरके)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या राजकारणाचे धक्के पन्हाळा तालुक्यातही बसू लागले असून, येथे नरकेे घराण्यातील भाऊबंदकी उफाळून आली आहे. कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके व चेतन अरुण नरके हे बंधू आमनेसामने आले आहेत. घराण्यातील दुफळीला अनेक कंगोरे असले तरी कुंभी कासारी साखर कारखान्यात संदीप नरके यांनी केलेला हस्तक्षेप, जिल्हा परिषद निवडणुकीतील संघर्ष येथेच नरके घराण्यातील फुटीची बीजे पेरली गेली.
पन्हाळा-गगनबावडा तालुक्याच्या राजकारणावर गेली चाळीस वर्षे माजी आमदार स्वर्गीय यशवंत एकनाथ पाटील व ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे वर्चस्व राहिले. पाटील व नरके या मामा-भाच्याच्या जोडीने आमदारकीसह जिल्हा बँक, गोकुळ या शिखर संस्थांवर आपली पकड कायम ठेवली. आमदार विनय काेरे यांच्या पन्हाळ्यातील राजकारणातील एंट्रीनंतर मामा-भाच्यांच्या वर्चस्वाला काहीसा धक्का लागला. त्यातून कोरे व पाटील, नरके यांच्यात टोकाचा संघर्ष पहावयास मिळाला. विधानसभा व जिल्हा बँक कोरे यांनी खेचून आणली असली तरी ‘गोकुळ’च्या राजकारणात अरुण नरके व माजी आमदार चंद्रदीप नरके यांची पकड कायम राहिली. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर विनय काेरे शाहूवाडीतून उभे राहिल्याने करवीरमधून चंद्रदीप नरके हे रिंगणात राहिले. पारंपरिक विरोधकांच्या वाटा वेगळ्या झाल्याने दोघांमधील संघर्ष कमी झाला.
चंद्रदीप नरके यांच्या २००९ व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अरुण नरके हे ताकदीने मागे राहिले. अरुण नरके हे ‘गोकुळ’च्या राजकारणात आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडीक यांच्या सोबत आहेत. ‘करवीर’मध्ये आमदार पाटील व चंद्रदीप नरके हे विरोधक, आमदार पाटील यांचे समर्थक ‘गोकुळ’चे संचालक हे ‘कुंभी’ व विधानसभा निवडणुकीत चंद्रदीप नरके यांना टाेकाचा विरोध करत असल्याने त्यांना मदत करू नये, असा दबाव कार्यकर्त्यांचा चंदद्रीप यांच्यावर असतो. तरीही चुलत्यासाठी त्यांनी ‘गोकुळ’मध्ये आमदार पाटील यांच्या पॅनलला सहकार्य करत आले. त्याचबरोबर विधानसभेला चंद्रदीप यांना मदत करतात म्हणून आमदार पाटील यांनी अरुण नरके यांना ‘गोकुळ’च्या राजकारणात बाजूला केले. ही वस्तुस्थिती आहे.
मात्र, ‘कुंभी’च्या २०१५ च्या निवडणुकीत अरुण नरके यांचे सुपुत्र संदीप नरके यांनी चंद्रदीप नरके यांना थेट आव्हान देत विरोधी पॅनलमधून उमेदवारी घेतली. संदीप यांच्या प्रचारात चेतन नरके आघाडीवर होते. त्यानंतर २०१७ ला झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कळे जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसकडून संदीप नरके तर कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेतून अजित नरके रिंगणात होते. येथे शहकाटशहाचे राजकारणात दोन्ही नरके बंधू पराभूत झाले. येथेच नरके घराण्यातील फुटीची बीजे पेरली गेली.
अजित यांच्या जोडीला देसाई की अमर पाटील
पन्हाळ्यातील दोन जागांपैकी विरोधी पॅनलमधून अजित नरके निश्चित आहेत. त्यांच्या जोडीला आमदार विनय काेरे विरोधी आघाडीसोबत राहिले तर त्यांच्याकडून यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. प्रकाश देसाई, अमर यशवंत पाटील यांच्यापैकी एकाची वर्णी लागू शकते.
‘मल्टीस्टेट’च्या मुद्याचा फायद्याऐवजी तोटाच
‘गोकुळ’ मल्टीस्टेटचा मुद्दा चंद्रदीप नरके यांनी आक्रमकपणे मांडत हाणून पाडला. त्याचा फायदा विधानसभेला होईल, अशी त्यांच्या गटाची अटकळ होती. मात्र, त्यातून विधानसभेला महादेवराव महाडीक यांनी नरके यांना ताकदीने विरोध केला. ज्यांच्यासोबत मल्टीस्टेटची लढाई केली ती मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांना आघाडी धर्म आडवा आला आणि सगळ्यांनी मिळून चंद्रदीप यांना घेरले.
कोट-
आमचे मार्गदर्शक अरुण नरके यांचे नेतृत्व मानून काम करत आहे. त्यांच्या प्रेमाखातर करवीरमध्ये नरके गटाच्या विरोधकांना ‘गोकुळ’मध्ये मतदान करत आलो. यातून गटाचे खच्चीकरण होत गेलेच आणि व्यक्तिगत माझे हाल झाले. घरात भांडणे नको म्हणून सर्व सोसले. मात्र, केवळ अरुणसाहेब आमच्या व्यासपीठावर आणि त्यांची मुले, कार्यकर्ते विरोधात राहिले. आता करवीरमधील नरके गटाच्या अस्तित्वासाठी हा निर्णय घ्यावा लागतोय.
- चंद्रदीप नरके (माजी आमदार)
प्रत्येकजण निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. आपण कोणाकडे लक्ष देत नाही, त्यावर आपणास काही बोलायचे नाही.
- अरुण नरके (संचालक, ‘गोकुळ’)