पन्हाळा : शनिवार, रविवार व सोमवारी नाताळच्या सुटीमुळे पर्यटकांची पावले पन्हाळ्याकडे वळू लागली आहेत.
कोल्हापूर शहरापासून अवघ्या वीस कि.मी.च्या अंतरावर असलेल्या पन्हाळगडाला ऐतिहासिक महत्त्व असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. सध्या सलग सुट्यांमुळे येथील तीन दरवाजा, अंधारबाव, सज्जाकोठी, धान्याचे कोठार, पुसाटी बुरूज परिसर, तबक उद्यान, लता मंगेशकर बंगला परिसर, आकाशवणी टॉवर परिसर, पावनगड, रेडेघाट येथे पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे पाहावयास मिळत आहेत. यामुळे लहान-मोठे व्यवसाय तेजीत सुरू आहेत.
भाजलेले व उकडलेले कणीस, पाणीपुरी, भेळ, रगडा, मिसळ, झुणका भाकर या खाद्यपदार्थांवर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत. या दोन दिवसांत गडावर सुमारे ५० हजार पर्यटकांनी विक्रमी हजेरी लावली.
दरम्यान, पन्हाळा येथे पर्यटकांच्या गर्दीमुळे वाहतुकीचा व वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. पन्हाळा येथील अंधारबाव परिसराचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. त्यामुळे या परिसरात बारा महिने गर्दीच असते. या परिसरातूनच पन्हाळ्याच्या पश्चिम भागाची व पावनगड, लता मंगेशकर बंगला परिसर येथील वाहतूक येथूनच सुरू असते. मात्र, सध्या वाहनांच्या व पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे या परिसरात वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग व येथे पर्यटकांच्या मनोरंजनासाठी मनोरंजनात्मक फनफेअरसारखी खेळणी जोरदार चालली आहेत.
पन्हाळ्यावर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली असून, येथे पायी चालणे देखील मुश्कील बनले आहे. तर पावनगड व सोमवारपेठ येथे येण्या-जाण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.पन्हाळगडावर सलग सुट्यांंमुळे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.जोतिबा डोंगर भाविकांनी फुललाजोतिबा : सलग आलेल्या सुट्यांमुळे जोतिबा डोंगरावर भाविकांची अलोट गर्दी झाली. चांगभलं...च्या गजरात मंदिरात धुपारती, पालखी सोहळा झाला. नाताळची सुटी सोमवारी असल्याने शनिवार, रविवार, सोमवार या सलग सुट्यांनमित्त भाविक व पर्यटक घराबाहेर पडले आहेत. रविवारी डोंगरावर भाविक, पर्यटकांसह शैक्षणिक सहलीमुळे अलोट गर्दी झाली. जोतिबा मंदिरात चार ते पाच पदरी दर्शन रांगा लागल्या होत्या. अकरा वाजता धुपारती सोहळा निघाला. ‘चांगभलं...’चा गजर करीत भाविकांनी गुलाल खोबºयांची उधळण केली. मंदिरात महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. वाहन पार्किंगवर वाहनांची गर्दी झाली होती.
दर्शन रांग व्यवस्थेसाठी कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस, देवस्थान समितीचे पुजारी, उत्कर्ष समितीचे कर्मचारी, स्वयंसेवक उपस्थित होते. रात्री ८ वाजता श्री जोतिबा देवाच्या मंदिर प्रदक्षिणेसाठी पालखी निघाली. भाविकांनी गुलाल, खोबरे उधळून श्री जोतिबा उत्सव मूर्तीचे दर्शन घेतले. जोतिबा डोंगर घाटात वाहनांची वर्दळ वाढली होती.
एस. टी. महामंडळाने खास जादा गाडीची सोय केली होती. महालक्ष्मी मंदिर, जोतिबा, पन्हाळा असा प्रवासाचा बेत भाविक व पर्यटकांनी आखला होता. शीतपेय, खेळणी, खाद्यपदार्थ, मिठाई, प्रसाद यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली.