पन्हाळा - केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२० चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. पन्हाळा शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग तिसऱ्यांदा पन्हाळ्याने बाजी मारली आहे.
देशात पंचवीस हजार लोकसंख्येत दहाव्या स्थानावर तर पश्चिमेकडील पाच राज्यात पहिल्या स्थानावर पन्हाळा सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये पन्हाळा शहर स्वच्छ शहरात राज्यात तिसऱ्या व देशात सहाव्या क्रमांकावर होते. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२० हे २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. स्वच्छता ॲपवरुन १ कोटी ७० लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मीडियावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला. तर साडे पाच लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडण्यात आलं होतेगतवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियानमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान मिळविलं यात पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदचे नांव होते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळालं होतं.
पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने पाच महत्वाचे निकष पुर्ण केलेने ५१२०.९४ असे गुण प्राप्त केले
- पन्हाळा शहरात प्रत्येक घरासह सार्वजनिक संडास बांधुन गाव हगणदारी मुक्त केले
- शहरातील सार्वजनिक कचरा उठाव व्यवस्थापन उत्तम तप्तहेने केले गेले तर गांव प्लास्टिक मुक्त केले
- घराघरातील ओला व सुका कचरा सकाळी नऊच्या आत गोळा करण्यास सुरवात केली
- सर्व ओल्या कचऱ्याचे गांडुळ खतात रुपांतर केले व त्याची विक्री केली
- सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना चांगली वागणुक व दर्जेदार आरोग्य सुविधा
फटाके वाजवुन, गुलाल उधळुन आनंद
पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रुपाली धडेल या पहिला क्रमांक आल्याने भावनाविवश होत माझ्या कारकीर्दीतील अविस्मरणीय दिवस सांगत सर्व पन्हाळा नगरवासीयांचे आभार मानले. पन्हाळा नगरवासीयांनी स्वच्छता अभीयानात पहिला क्रमांक आल्याने फटाके वाजवुन व गुलाल उधळुन आनंद व्यक्त केला