नितीन भगवान ।पन्हाळा : गतवर्षी महाराष्ट्र शासनाची १३ कोटी वृक्षलागवडीची मोठी संकल्पना त्यात पन्हाळा तालुक्याच्या वतीने सव्वा लाख रोपलागवडीच्या उद्दिष्टापैकी ९५ हजारच रोपे लावली गेली. सरासरी ८० टक्के रोपे जगली असून वनविभाग, सामाजिक वनविभागाचे मोलाचे योगदानआहे.
वनविभाग, सामाजिक वनविभाग या दोहोंनी मिळून सुमारे ९० हजार वृक्षलागवड केली असुन शासनाच्या जीपीएस प्रणालीद्वारे नागपूर कार्यालय प्रत्येक महिन्याला तपासणी होत असल्याने ही वृक्षलागवड ८० टक्के जगली आहेत या रोपांना टँकरद्वारे पाणी मिळत असल्याने या वृक्षांची वाढ चांगली होत आहे वनविभागाने ७० हजार तर सामाजिक वनविभागाने २० हजार वृक्षांची लागवड केली आहे. पारंपरिक वृक्षांची लागवड केल्याने लागवड झालेल्या गावातील लोकांचा सहभाग पण चांगला आहे.
वनविभागाने तालुक्यातील पडसाळी, वाशी, कणेरी, काळजवडे, पोहाळे तर्फे बोरगाव या गावाजवळील वनविभागाच्या जमिनीवर सुमारे ७० हजार वृक्षांची लागवड केली असून बहुतेक ठिकाणी ८० टक्के वृक्ष चांगले जगले असून वर्षभरात त्यांची वाढ चांगली झाली आहे तर सामाजिक वनविभागाने पणोरे, सावर्डे, जाखले, पोहाळे तर्फे आळते व माजगांव येथे २० हजार वृक्षलागवड केली असून याठिकाणी पण ८० ते ८५ टक्के वृक्षांची चांगली वाढ झाली आहे. या सर्व लावलेल्या वृक्षांना प्रत्येक आठवड्याला टँकरद्वारे पाणी दिले जाते.
पन्हाळा तालुक्यातील अन्य विभागांने वृक्षसंवर्धन कमिटीच्या वेळोवेळी झालेल्या बैठकींमध्ये अग्रक्रमाने भाग घेतला पण गांभीर्याने वृक्षारोपण केलेच नाही. त्यात पंचायत समिती, ग्रामपंचायत विभाग, तालुका कृषी विभाग, कार्यकारी अभियंता सा. बां. पंचायत समिती विभाग, कार्यकारी अभियंता वारणा कालवे विभाग क्र.१, उपनिबंधक सहकारी संस्था पन्हाळा, प्राथमिक शिक्षण विभाग, पंचायत समिती पन्हाळा, विभागीय सह. संचालक उच्चशिक्षण कोल्हापूर, पोलीस निरीक्षक पन्हाळा, कळे, कोडोली, सहा. आयुक्त समाजकल्याण अधिकारी कोल्हापूर, कार्यकारी अभियंता लघुसिंचन (जलसंधारण) विभाग कोल्हापूर, प्राचार्य औद्योगिक प्रक्षिक्षण संस्था पन्हाळा, तहसीलदार पन्हाळा, महिला व बालविकास अधिकारी पंचायत समिती पन्हाळा, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) विभाग पन्हाळा, या १५ विभागांने मागणी केली नाही आणि रोपे लावली पण नाहीत. वृक्षलागणीकडे ही कार्यालये गांभीर्याने पाहत नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार का? असा सवाल नागरिकांतून विचारला जातोय.पर्यटकांकडून डोंगर पेटवण्याचे प्रकारपन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेने गतवर्षी २५०० वृक्ष लागवड केली होती. त्यातील केवळ २० टक्के वृक्ष जगले असून देखभालीची अनास्था व पर्यटकांकडून उन्हाळ्यात पेटवले जाणारे जंगल यामुळे वृक्ष जगण्याचे प्रमाण कमी असल्याचे मुख्याधिकारी कैलाश चव्हाण यांनी सांगितले.