कोल्हापूर : पन्हाळा विद्यामंदिर, पन्हाळ्याच्या १९८५ च्या तुकडीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी पन्हाळगडावर रंगला. पन्नासी गाठलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत या शाळेतील सुखद आठवणींना उजाळा दिला.पन्हाळा विद्यामंदिर या शाळेतून १९८५ मध्ये दहावी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले. सज्जा कोठी येथील परिसरात झालेल्या या कार्यक्रमात अनेकजण उपस्थित होते. यावेळी अनेकजण जुन्या मित्रांना भेटण्यासाठी पन्हाळ्यावर आले आणि शाळेतील आठवणी जागविल्या.यावेळी एकमेकांनी तिळगूळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रत्येक माजी विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देउन स्वागत करण्यात आले. सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी पाचवाजेपर्र्यंत या तुकडीच्या मित्र-मैत्रिणींनी गप्पा रंगवल्या. यावेळी प्रत्येकाच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट घटनांच्या माहितींची देवाण-घेवाण करण्यात आली. गेल्या वर्षांपासून हा स्नेहमेळावा पन्हाळा परिसरात घेण्यात येत आहे.या मेळाव्याचे नियोजन माजी नगराध्यक्ष जितेंद्र पोवार यांनी केले. यावेळी महावितरणचे अधिकारी राजेंद्र देसाई, माजी सरपंच तानाजी कोंडे, कैलास कोठावळे, नंदा जाधव, प्रमिला भोसले-चव्हाण, अस्लम मुल्ला, बाजीराव पोवार, नाना खोत उपस्थित होते.