पन्हाळा: पन्हाळागडाचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश होण्यासाठी येथील लोकसहभाग महत्त्वाचा असून नागरिकांनी सकारात्मक दृष्टीकोनातून मानांकनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. ५ आक्टोंबर रोजी पथक पन्हाळागडाला भेट देऊन आढाव घेणार असून या भेटीनंतर पन्हाळागडास मानांकन प्राप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी येडगे यांनी पन्हाळगडावर भेट देऊन पाहणी केली व त्या अनुषंगाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना आराखड्याची माहिती देऊन येथील नागरीकांशी संवाद साधला. दरम्यान व्यावसायिकांवर अन्याय होवू देणार नाही अशी ग्वाही दिली.पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी येडगे यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळील तलावाला नैसर्गिकरीत्या बांधणीचे रुप देण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन दरवाजा वास्तूची पाहणी करून चर्चा केली, धर्मकोठी, बाजार पेठ, रेडेमहल यांची पाहणी करुन माहिती घेतली. संभाजी महाराजांच्या मंदिराला भेट देऊन इतिहास जाणून घेतला. राज्यातील अकरा गड किल्ल्यांचे जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश होण्यासाठी प्रस्ताव सादर झाले असून प्राथमिक स्वरूपात मानांकन प्राप्त हालचाली गतिमान झाल्या आहेत. या यादीत प्रामुख्याने पन्हाळागडाचा समावेश आहे.छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे आणि जिजाऊ तसेच ताराराणी यांचा पदस्पर्शाने इतिहास लाभलेला पन्हाळागडाचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. यावेळी जागतिक वारसा स्थळाच्या सुचनेनुसार लोकांना विशेष पेहरावा, व्यावसायिकांनाही ऐतिहासिक वास्तू पासून पन्नास ते शंभर मीटर अंतरातील अतिक्रमण हटविण्याची सुचनाही केली.यावेळी मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, प्रांत समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, पुरातत्व पन्हाळा विभागाचे संरक्षण सहाय्यक बाबासाहेब जंगले, विजय चव्हाण, अधीक्षक अमित माने, सार्वजनिक बांधकाम पन्हाळा विभाग अभियंता सचिन कुंभार, पोलीस अधिकारी संजय बोंबले, वन अधिकारी अनिल मोहीते, संग्राम भोसले, अमोल कोळी व रवींद्र धडेल आदी मान्यवर उपस्थित होते.
Kolhapur: पथकाच्या आढाव्यानंतर पन्हाळागडाला लवकरच मानांकन, लोकसहभाग महत्त्वाचा - जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 6:53 PM