आॅनलाईन लोकमत/संदीप आडनाईक
कोल्हापूर : देखणा आणि दणकेबाज अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनामुळे पन्हाळकर हळहळले. १९७८ आणि १९९६ या काळात विनोद खन्ना दोन चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी पन्हाळगडावर मुक्कामी होते. या काळात त्यांच्या पन्हाळ्यातील चित्रपट रसिकांशी चांगले ऋणानुबंध जुळले होते.
पन्हाळगडावर १९७८ मध्ये ‘लहू के दो रंग’ या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. पन्हाळ्यावरील हॉटेल रसना येथे तसेच अंबरखाना परिसरात या चित्रपटातील हाणामारीची काही दृश्ये चित्रित करण्यात आली होती. महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिनेता डॅनी, हेलन, शबाना आझमी, इंद्राणी मुखर्जी, रणजित, आदी कलाकारांनी भाग घेतला होता. या चित्रपटाचे कलादिग्दर्शन मधुकर शिंदे यांनी केले होते. अभिनेता विनोद खन्ना यांची या चित्रपटात दुहेरी भूमिका होती.
अंबरखाना परिसरातील धान्याच्या कोठारावर डॅनी, रणजित आणि विनोद खन्ना यांच्यातील काही दृश्ये चित्रित करण्यात आली होती. यावेळी हॉटेल रसनामध्ये विनोद खन्ना व इतर सहकलाकार चहापानासाठी थांबत. त्यावेळी पन्हाळकरांना आपल्या या आवडत्या कलाकाराला जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यावेळीही विनोद खन्ना यांचे देखणे व्यक्तिमत्त्व पाहण्यासाठी कोल्हापूरहून अनेक चाहते पन्हाळ्यावर आल्याचे हे चित्रीकरण प्रत्यक्ष पाहणाऱ्या चित्रपटरसिकांनी सांगितले.
दुसरी आठवण ‘शत्रुता’ या १९९६ मध्ये पन्हाळ्यावर झालेल्या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या प्रसंगाची आहे. या चित्रपटाचे पन्हाळ्यावर विविध ठिकाणी चित्रीकरण झाले. जवळजवळ तीन आठवडे अनेक मातब्बर कलावंत या चित्रपटाच्या चित्रीकरणात सहभागी झाले होते. यामध्ये इंद्राणी मुखर्जी, कुलभूषण खरबंदा या कलाकारांनी भाग घेतला होता.
पन्हाळगडावरील महाराणी ताराराणींच्या राजवाड्यासमोरील जागेत म्हणजे शिवाजी महाराजांच्या मंदिरासमोरील जागेत, साठमारी, तीन दरवाजा, संभाजी महाराजांचे मंदिर या परिसरात हे चित्रीकरण झाले होते. संभाजी महाराज मंदिर परिसरातील चित्रीकरणादरम्यान स्फोटाच्या दृश्याचे आणि इंद्राणी मुखर्जी यांना बांधून घातलेल्या दृश्याचे चित्रीकरण झाले होते. त्यावेळी ते हॉटेल मेघदुतमध्ये वास्तव्यास होते.
रोज सकाळी बॅडमिंटन खेळणे हा त्यांचा शिरस्ता. याही वेळेस विनोद खन्ना यांच्या चाहत्यांनी पन्हाळगडावर गर्दी केली होती. हा चित्रपट अद्यापही प्रदर्शित झालेला नाही. या दोन चित्रपटांच्या चित्रीकरणामुळे पन्हाळकरांशी विनोद खन्ना यांचे ऋणानुबंध जुळले होते. त्यांच्या निधनामुळे पन्हाळ्यातील चित्रपट चाहत्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.