कोल्हापूर : पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयातील साडेतीन हजार रुपयांच्या लाचप्रकरणी पाचजणांना जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली; तर लिपिक संशयित गीता पांडुरंग बोटे यांना शनिवारपर्यंत तात्पुरता जामीन दिला. या सहाजणांना विशेष न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात गुरुवारी हजर करण्यात आले होते.पन्हाळ्याचे दुय्यम निबंधक संशयित यशवंत सदाशिव चव्हाण, शिपाई प्रकाश यशवंत सणगर, कॉम्प्युटर आॅपरेटर नितीन कोंडिबा काटकर, सुशांत दत्तात्रय वणिरे, खासगी उमेदवार शहाजी बळवंत पाटील आणि लिपिक गीता पांडुरंग बोटे या सहाजणांना लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि. २८) पकडले होते. गुरुवारी या सर्वांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले.
संशयित आरोपींनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला. या सहा आरोपींमध्ये महिला असल्याने व साक्षीदारांवर कोणताही दबाव आणू शकणार नाही; त्यामुळे गीता बोटे यांना न्यायालयाने शनिवारपर्यंत तात्पुरता जामीन दिला. अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडीकरिता कारागृहात पाठविले. सर्वांच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे.
या कामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. समिउल्ला पाटील, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले.