कोल्हापूर : पाणीपुरी, भेळ, रगडापुरी म्हटलं की उत्तर भारतीयांची मक्तेदारी असते. असला व्यवसाय मराठी माणसाने करणं म्हणजे कमीपणाचेच असते हा मुळातच चुकीचा समज खोटा ठरवण्याचे काम मूळच्या कराड तालुक्यातील काले गावच्या तरुणाने केले आहे. नितीन काकासाहेब पाटील असे त्याचे नाव असून गेली पाच वर्षे तो येथील राजारामपुरीत सिटी हॉस्पिटलजवळ पाणीपुरी विकत असून त्यावर त्याचा संसाराचा गाडा उत्तम पद्धतीने सुरू आहे. कोणतेही काम हलके किंवा कमी दर्जाचे नसते याचेच प्रत्यंतर त्यातून येत आहे.
नितीन अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा. बारावीपर्यंत शिकला. नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडला. नातेवाईकांच्या मदतीने एका हॉस्पिटलमध्ये नोकरीला लागला. काही दिवसानंतर त्याचं मन नोकरीत रमेना, त्याने त्याच चौकात पाणीपुरी विक्रीस सुरुवात केली. सहाजिकच त्याला अनेक जणांनी हा उद्योग आपला नाही, यूपी, बिहारवरून आलोय का आपण? असे सल्ले, टोमणे दिले. पण नितीन ठाम होता. त्याने फेमस पाणीपुरी नावाने गाडा सुरू केला, गेली पाच वर्षे हा व्यवसाय निष्ठेने करतोय. त्याच्या पाणीपुरीला चवही चांगली आहे. अनेकजण त्याला विविध समारंभाच्या ऑर्डर्स देत आहेत. त्यातून त्याला चांगले कुटुंब चालवता येईल इतके पैसे मिळतात. सकाळी तयारी करून तो दिवसभर हा गाडा चालवतो. समाजात हल्ली अगदी शिपायाची तरी नोकरी लावा म्हणणारे अनेकजण भेटतात. मी काय करू कोणता उद्योग करू, मी हे कसं करू ते कसं करू, असं म्हणणारेही खूप आहेत. मात्र याच वयाच्या नितीन पाटीलने वेगळं धाडस केलं आणि ते यशस्वीही करून दाखवले.
फोटो : ०९०६२०२१-कोल-पाणीपुरी
कोल्हापुरातील राजारामपुरीतील सीटी हॉस्पिटलजवळ कराडजवळचा काले गावचा नितीन पाटील हा तरुण पाणीपुरीचा गाडा चालवून जीवनात स्थिरस्थावर झाला आहे.