कोल्हापूर : महानगरपालिका व एकटी संस्था यांच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील बेघर महिला निवारा केंद्राला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी बुधवारी भेट देऊन तेथील सुविधांची माहिती घेतली.
महानगरपालिकेच्या सहकार्याने एकटी संस्था गेल्या चार वर्षांपासून शहरी बेघरांकरिता चार निवारा केंद्र चालवत आहे. त्यातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील विचारे विद्यालय येथे सुरु असलेल्या केंद्राला पंकज देशपांडे यांनी भेट दिली. यावेळी ‘एकटी’च्या अध्यक्ष अनुराधा भोसले यांनी हे काम करताना संस्थेला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, याची माहिती दिली.
निवारा केंद्रातील बेघर लाभार्थ्यांना कौशल्य विकास उपक्रम, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त तक्रारी, मालमत्तेसंदर्भातील तक्रारी, आधारकार्ड, मानसिक आजारी बेघर लाभार्थ्यांसाठी कायमस्वरुपी निवाऱ्याची सोय आदी विषयांवर चर्चा करण्याकरिता लवकरच बैठक घेण्यात येणार आहे.