कोल्हापूर : मोक्का गुन्ह्यातील कारवाईनंतर गेले दोन महिने पोलिसांना गुंगारा देणारा एसटी गँगचा सदस्य पंकज रमेश पोवार (वय २९, रा. ई-वॉर्ड, बाईचा पुतळा, राजारामपुरी १४वी गल्ली, कोल्हापूर) याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मुसक्या आवळल्या. शिये फाटा (ता. करवीर) येथे गुरुवारी पहाटे त्याला अटक केली.
दोन महिन्यांपूर्वी संघटित गुन्ह्याप्रकरणी एसटी गँगच्या एकूण १२ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. त्यापैकी यापूर्वी १० जणांना अटक केली आहे, तर जब्बा ऊर्फ विराज विजय भोसले व विशाल प्रकाश वडर हे दोघे अद्याप फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूर शहर व परिसरात खून, जबरी चो-या, दुखापत, गर्दी-मारामारी, खूनाचा प्रयत्न, जाळपोळ आदी विविध संघटित गुन्ह्यांप्रकरणी एसटी गँगच्या १२ सदस्यांवर ६ मे रोजी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशाने मोक्काअंतर्गत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले. त्यातील फरारी आरोपी पंकज पोवार हा गुरुवारी सकाळी शिये फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो. नि. तानाजी सावंत व त्यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली.यापूर्वीच एसटी गँगच्या साईराज दीपक जाधव, हृषीकेश ऊर्फ गेंड्या बाबासाहेब चौगुले, आसू बादशहा शेख, अर्जुन बिरसिंग ठाकूर, नितीन ऊर्फ बॉब दीपक गडीयाल, प्रसाद जनार्दन सूर्यवंशी, करण उदय सावंत, रोहित बजरंग साळोखे, (रा. मुकुंद कलकुटकी, सर्व रा. शाहूनगर, राजारामपुरी, कोल्हापूर) यांना अटक केली आहे.
गुरुवारी पोवार याला अटक केली, तर जब्बा ऊर्फ विराज भोसले व विशाल वडर (दोघे रा. शाहूनगर) हे दोघे अद्याप फरारी असून पोलिसांना गुंगारा देत आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.