कोल्हापूर पंकजा मुंडे या समजूतदार नेत्या आहेत. हे त्यांनी दाखवून दिले आहे. ज्यांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये संघर्ष करायला शिकवला त्या गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. समजूतदारपणामुळेच त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना राजीनामे देण्यापासून परावृत्त केले, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
गेल्यावर्षीपासून कोरोनाकाळात विविध पातळ्यांवर सामाजिक काम करणाऱ्या संस्थांचा सत्कार बुधवारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
सुरुवातीलाच पाटील यांना मुंडे यांच्या नाराजीबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले, देशभरातून ४० जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. सर्व प्रकारचा समतोल राखताना अनेकांना संधी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोणावर तरी अन्याय होतो. त्यामुळे मंत्रीपद मिळाले नाही याबद्दल नाराजी असून शकते; परंतु कार्यालयातून भाजप रस्त्यावर आणणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सांगणाऱ्या पंकजा मुंडे यांनी पक्ष हे आपले घर आहे आणि ते आपण सोडून जायचे नाही, या शब्दांत कार्यकर्त्यांची समजूत घातली आहे.
चौकट
पुणे जिल्ह्यातील जमिनीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, मुळात ज्या देवस्थान जमिनीच्या भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर झाला. त्या जमिनीची देवस्थानच्या रजिस्टरमध्ये नोंदच नाही. १९५५ सालापासून ही जमीन एका व्यक्तीच्या नावावर आहे. नंतर त्या व्यक्तीने या जमिनीचा ट्रस्ट केला असेल. १९९७ साली ही जागा विकण्याची परवानगी धर्मादाय आयुक्तांनी दिली. २००८ साली देवस्थान काढून वर्ग-१ करण्यासाठी परवानगी दिली. दोन्ही वेळा मी सरकारमध्ये नव्हतो. त्यानंतर या जमिनीचा नजराणा किती घ्यायचा याचा वाद सुरू झाला. त्यामुळे ही फाइल मी पुनर्विचारासाठी पाठवली. त्यामुळे यात भ्रष्टाचार करण्याचा प्रश्नच येत नाही. हा प्रकार म्हणजे शिळ्या कढीला ऊत आहे.