कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक व अष्टपैलू कलाकार पंडित अभय फगरे यांना यंदाचा पंडित पन्नालाल घोष स्मृती गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. साडेचार किलो ब्रॉंझचे स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सोमवारी (दि.२८) देवल क्लबमधील भांडारकर कलादालनात सायंकाळी सहा वाजता पुरस्कार वितरण होईल. त्यानंतर संगीत मैफलीत गायन आणि बासरी वादनांची जुगलबंदी अनुभवता येणार आहे. संयोजक बासरीवादक सचिन जगताप यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
विनामूल्य असणारा हा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेऊन होत आहे. पंडित अभय फगरे यांचे शिष्य अनुपम वानखेडे आणि विदुषी मिरा व्ही. राव, पंडित विजय सरदेशमुख यांचे शिष्य गायक सारंग फगरे या दोघांची बासरी आणि गायनाची जुगलबंदी रंगणार आहे. मॉ. अन्नपूर्णा देवी यांचे पटशिष्य व पन्नालाल घोष यांचे शिष्य बासरीवादक पंडित नित्यानंद हळदीपूर यांचे बासरीवादन होणार आहे. तबला साथसंगत गिरीधर कुलकर्णी व प्रशांत देसाई हे देणार आहेत.
चौकट ०१
कोल्हापुरातील प्रसिद्ध बासरीवादक सचिन जगताप हे कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नसतानाही पदरमोड करून गेली ११ वर्षे पन्नालाल घोष संगीत संमेलन भरवत आहेत. आता याला अधिक व्यापक स्वरूप येण्यासाठी पन्नालाल घोष स्मृती फौंडेशनची स्थापना करण्यात येणार आहे.
चौकट ०२
पुरस्कार जाहीर झालेले पंडित अभय फगरे हे बासरीसह तबलावादकही आहेत. आकाशवाणीची ए ग्रेड पदवीधारक आहेत. कुमार गंधर्वाची गायकी त्यांनी बासरीवादनात समाविष्ट केली आहे. बिरजू महाराजांसारख्या नृत्य गुरुसोबत बासरीची साथसंगतही केली आहे. बॅलेचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. रशिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, मोरोक्को, ब्राझील, न्यूझीलंड येथे संगीत मैफली सजवल्या आहेत.
फोटो : २६१२२०२०-कोल-अभय फगरे-पुरस्कार