कोल्हापूर : येथील जिल्हा सत्र न्यायालयातच ज्येष्ठ सामाजिक नेते अॅड. गोविंद पानसरे यांचा खटला चालावा, याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दिल्याचा अहवाल दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) अधीक्षक तुषार दोशी यांनी मंगळवारी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्यातर्फे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात सादर केला. यावेळी विशेष तपास पथक ( एसआयटीचे) प्रमुख व अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे हेही न्यायालयात हजर होते. पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला होणार आहे. दरम्यानच्या, काळात महाराष्ट्र शासनाकडून हा खटला कोठे चालवावा याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.पानसरे खटल्यातील साक्षीदार, पंच हे कोल्हापूर आणि परिसरातील आहेत. तसेच दहशतवाद विरोधी पथक सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रामध्येच कोल्हापूर जिल्हा येतो. खटल्यातील साक्षीदार, पंच, संशयित आरोपी यांना सोलापूर न्यायालयात ये-जा करणे जोखमीचे होणार आहे. त्यामुळे हा खटला कोल्हापूर जिल्ह्यातीलच न्यायालयात चालवावा, असा अहवाल दहशतवाद विरोधी पथकाकडून महाराष्ट्र शासनाला पाठवण्यात आला आहे.अॅड. पानसरे खून खटल्यातील संशयित आरोपी समीर गायकवाड हा सुद्धा मंगळवारच्या सुनावणीवेळी न्यायालयात हजर होता. तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. त्यामुळे विशेष तपास पथक यांच्याकडे हजेरी द्यावी की नाही असा मुद्दा संशयित आरोपींच्या वकील प्रीती पाटील यांनी उपस्थित केला. यावर अॅड. राणे यांनी एटीएस अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील सुनावणीपर्यंत गायकवाड याने कोल्हापुरात एसआयटीमध्येच प्रत्येक रविवारी हजेरी द्यावी, अशी विनंती केली. यावर न्यायाधीश तांबे यांनी पुढील सुनावणीपर्यंत कोल्हापुरातच हजेरी द्यावी, असे आदेश दिले.
कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयातच पानसरे खटल्याची सुनावणी व्हावी, एटीएसकडून राज्य सरकारला प्रस्ताव
By भीमगोंड देसाई | Published: September 06, 2022 7:16 PM