कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर विष्णू गायकवाड याची सुनावणी बुधवारी दुपारी चारच्या सुमारास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. यावेळी न्यायमूर्ती आर. डी. डांगे यांनी हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करीत असल्याचे समीरला सांगितले. त्यानुसार सत्र न्यायालयात या खटल्याच्या सुनावणीला दि. १३ जानेवारीला प्रारंभ होईल. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी १४ डिसेंबर २०१५ रोजी आर. डी. डांगे यांच्या न्यायालयात समीर गायकवाडवर दोषारोपपत्र दाखल झाले. या प्रकरणी त्याला म्हणणे मांडण्यासाठी १८ डिसेंबरची तारीख दिली होती; परंतु तांत्रिक बिघाडामुळे ही सुनावणी झाली नाही. बुधवारच्या सुनावणीसाठी समीरला न्यायालयात हजर करण्याची शक्यता होती; परंतु विधान परिषदेच्या मतमोजणीवरील बंदोबस्ताच्या कारणामुळे त्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्ही.सी.)द्वारे घेण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती आर. डी. डांगे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे समीरशी संवाद साधला. त्याला सुरुवातीला नाव विचारले. त्यानंतर तुझ्याविरोधात पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. ते ३९२ पानांचे असल्याने हा खटला या न्यायालयात चालू शकत नाही. त्यामुळे हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करीत असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले. त्यावर समीरने ‘हो’ म्हणून उत्तर दिले. त्यानंतर न्यायमूर्ती डांगे यांनी सत्र न्यायालयात या खटल्याचा प्रारंभ १३ जानेवारी रोजी होईल, असेही सांगितले. समीर गायकवाड याच्याविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डांगे यांच्या न्यायालयात हा खटला तीन महिने चालला. या कालावधीत सुनावणीसाठी समीरला तीन वेळा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर दोन वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच हजर करण्यात आले. त्याच्या वकिलांनी सुनावणीसाठी समीरला हजर करा, असा न्यायालयास दोन वेळा विनंती अर्ज सादर केला होता; परंतु पोलिसांनी सुरक्षेचे कारण पुढे करीत त्याला हजर केले नव्हते. जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याच्या सुनावणीसाठी पोलीस समीरला हजर करण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर साक्षीदारांना समन्स बजावून त्यांच्या साक्षी घेतल्या जातील. यावेळी सहायक सरकारी वकील चंद्रकांत बुधले, पोलीस निरीक्षक अमृत देशमुख, अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रकाश मोरे, गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा, समीरचे वकील अॅड. एस. व्ही. पटवर्धन, अॅड. एम. एम. सुवासे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पानसरे खटला सत्र न्यायालयाकडे वग
By admin | Published: December 31, 2015 12:50 AM