आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर , दि. 0६ : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनांतील आरोपींना दहशतवादी जाहीर करा. या प्रमुख मागणीसह आरोपी व सूत्रधारांना त्वरित अटक करा, यांसह अन्य मागण्यांसाठी शनिवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे नूतन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची १६ फेबु्रवारी २०१५ ला भर दिवसा रस्त्यावर गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. सात महिन्यांनंतर संशयित मारेकरी समीर गायकवाड याला अटक करण्यात आली. मात्र, अद्यापही सूत्रधारापर्यंत व अन्य आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अपयश आले आहे, असा आरोप शिष्टमंडळाने केला. यात एका संस्थेच्या धार्मिक कार्याच्या बुरख्याआडून खुनी, हिंसक, अतिरेकी कारवाया करणाऱ्या या आरोपींना दहशतवादी व अतिरेकी जाहीर केले पाहिजेत. यांसह संस्थेवरही बंदी घातली पाहिजे. या संस्थेचे अनुयायी वारंवार बॉम्बस्फोट, खून प्रकरणांमध्ये सापडत आहेत. यातील खरे सूत्रधार व इतर आरोपी याच संस्थेतील असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संस्थेतील अनुयायींची माहिती पोलिसांकडे देणे सक्तीचे करावे. यासह दाभोलकर हत्याकांडातील आरोपींची माहिती कोल्हापुरातील साक्षीदाराने स्थानिक पोलिसांना सांगितली होती. मात्र, याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. हीच बाब ‘सीबीआय’च्या तपासात त्या साक्षीदाराने सांगितली आहे. त्यामुळे या खुनातील इतर आरोपी व खऱ्या सूत्रधारांना लवकरात लववकर अटक करा. एक धडाडीचे पोलीस अधिकारी म्हणून नाशिक, मुंबई, आदी ठिकाणी आपण अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील या महत्त्वाच्या खुनातील आरोपींना लवकरच अटक कराल, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने व्यक्त केली.
यावेळी नूतन पोलीस अधीक्षक मोहिते यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तपास सुरू आहे. अन्य आरोपींच्या अटकेसाठी ‘एसआयटी’ व स्थानिक पोलीस सर्व शक्ती पणाला लावून काम करीत आहेत. तपास अधिकारी अतिरिक्त अधीक्षक दर्जाचाच राहणार आहे. वेगाने काम करून या प्रकरणातील आरोपींना अटक करू, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी करवीरचे पोलीस उपअधीक्षक हर्ष पोद्दार उपस्थित होते. शिष्टमंडळात पक्षाचे राज्य सचिव सदस्य नामदेव गावडे, महिला फेडरेशनच्या अध्यक्षा स्मिता पानसरे, जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, जिल्हा सहसचिव कृष्णात जाधव, सम्राट मोरे, शहर सचिव अनिल चव्हाण, बन्सी सातपुते, बी. एल. बरगे, दत्ता मोरे, धीरज कटारे, दिलदार मुजावर, आदींचा समावेश होता.