कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आठवा संशयित आरोपी अमित रामचंद्र डेगवेकरला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांनी ७ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्याला हजर केले होते. रात्री उशिरा त्याला बंगलोरला हलविण्यात आले.पानसरे हत्या प्रकरणात अमित डेगवेकर याने शस्त्र पुरवणे, पानसरेच्या हत्येच्या कटासंदर्भात बेळगावमध्ये बैठक झाली होती, त्या बैठकीला उपस्थित राहणे. बेळगाव परिसरात झालेले बॉम्बस्फोट प्रशिक्षण आणि गोळीबाराच्या वेळी प्रत्यक्ष सहभागी असल्याचा आरोप आहे. तसेच पानसरे यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, त्याची रेकी करण्याचे काम त्याच्यावर होते.
१५ जानेवारीला त्याला बंगलोर येथून अटक केली होती. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तपास अधिकारी तिरूपती काकडे यांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार केला होता. त्याच्या जबाबातून काही महत्त्वाचे पुरावे पथकाच्या हाती लागले आहेत.
तो पुरवणी अहवाल सोमवारी न्यायालयात सादर करण्यात आला. आतापर्यंत एसआयटीने केलेल्या तपासाचा पुरवणी अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. हा संपूर्ण तपास गोपनीय असल्याने एसआयटीने तपासाची माहिती बाहेर पडू नये, याची दक्षता घेतली आहे.दुचाकीसह शस्त्रांचा पत्ताच नाहीपानसरे हत्येमध्ये वापरलेल्या दोन दुचाकी आणि दोन पिस्तुले यांचा अद्यापही ठावठिकाणा तपास पथकाच्या हाती लागलेला नाही. आतापर्यंत आठ आरोपींपैकी सहा आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये दुचाकीसह पिस्तुले कोठे लपविण्यात आली, याबाबत काहीच माहिती पथकाला मिळालेली नाही. पानसरे हत्येतील फरारी आरोपी विनय पवार, सारंग अकोळकर यांचा अद्यापही ठावठिकाणा मिळालेला नाही.