कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर गायकवाड हा सध्या जामिनावर बाहेर आहे. परंतु, त्याला जामीन देताना न्यायालयाने अनेक अटी घातल्या आहेत. त्या शिथिल कराव्यात यासाठी गायकवाडने आपले वकील समीर पटवर्धन यांच्यावतीने कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला; मात्र न्यायाधीश शेळके सुटीवर असल्याने ही सुनावणी सात आॅगस्टला ठेवण्यात आली.समीर गायकवाडला दर रविवारी एसआयटीला हजेरी, सांगली जिल्हा सोडायचा नाही, न्यायालयीन कामकाजाव्यतिरिक्त कोल्हापुरात येऊ नये, यासह अनेक अटी घातल्या आहेत. अशा अटींमुळे समीरला पै-पाहुण्यांकडे जाता येत नाही किंवा काही वैयक्तिक कामेही करता येत नाहीत.
त्यामुळे त्याच्यावरील अटी शिथिल व्हाव्यात, असा अर्ज सोमवारी अॅड. पटवर्धन यांनी न्यायालयात सादर केला. मात्र, न्यायाधीश सुटीवर असल्याने व वकील संघटनांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतल्याने न्यायालयीन कामकाज झाले नाही.