कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार संशयित अमोल काळे याचे कळंबा, उद्यमनगरात वास्तव्य होते. त्याच्या खोलीवर पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या शार्प शूटरांची ऊठबस असायची.
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या कटामध्ये काळेचा महत्त्वाचा सहभाग असल्याचा संशय ‘एस.आय.टी.’ला आहे. त्याचा ताबा घेतल्यानंतर अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती लागणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या चारही हत्यांचा मास्टरमाइंड संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे असल्याचे प्राथमिक तपासात पुढे येत असले तरी कर्ताकरिता दुसराच आहे. अमोल काळे हा कोल्हापुरात वास्तव्याला असताना त्याने पानसरे यांच्या हत्येची रेकी केल्याचा संशय आहे. तो राहत असलेल्या कळंबा व उद्यमनगर येथील खोलीवर पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या शार्पशूटरांची ऊठबस असायची.यावेळी त्याला एका संघटनेने मदत केली असल्याचे पुढे येत आहे. त्याच्या वास्तव्याची चौकशी करताना ‘एस.आय.टी.’च्या हाती ही माहिती आली आहे. काळेचा ताबा घेतल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. उद्या, मंगळवारी त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे.