कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आजअखेर केलेल्या तपासाचे ४०० पानी पुरवणी दोषारोपपत्र ‘एसआयटी’ने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांचेकडे सोमवारी दाखल केले. आरोपपत्रामध्ये संशयित अमोल अरविंद काळे (वय ३५, रा. पिंपरी-चिंचवड, पुणे), वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. यावल, जि. बेळगाव), भारत उर्फ भरत जयवंत कुरणे (३७, रा. महाद्वाररोड बेळगाव), अमित रामचंद्र डेगवेकर (३८, रा. दौडामार्ग, सिंधुदूर्ग) या चौघांचा पानसरे हत्येमध्ये प्रत्यक्ष सभाग असून खून, खूनाचा प्रयत्न, साक्षीदारांच्या मदतीने हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सुमारे ८५ साक्षीदारांचे जबाब घेतले आहेत.
दरम्यान चौघेही संशयित सनातन संस्थेशी संबधीत आहेत. यापूर्वी पानसरे हत्येप्रकरणी समीर गायकवाड, डॉ. विरेंद्रसिंह तावडे, सारंग अकोळकर, विनय पवार यांचे विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले आहे. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी एसआयटीचे तपास अधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांचेकडून दोषारोपपत्र न्यायालयासमोर सादर केले.