कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट संशयित भरत कुरणेच्या बेळगाव येथील फार्महाऊसवर रचला. हत्येनंतर पिस्तुलांसह मोटारसायकलींची विल्हेवाट लावण्यासाठी कोल्हापुरातील टेंबलाईवाडी मंदिर परिसरात बैठक झाली. यावेळी मास्टरमाइंड वीरेंद्र तावडे याच्यासह अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भरत कुरणे यांच्यासह अनोळखी चार व्यक्ती होत्या, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. शुक्रवारी सूर्यवंशी आणि कुरणे यांना न्यायाधीश एस. एस. राऊळ यांच्यासमोर हजर केले असता आणखी त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने संशयित भारत ऊर्फ भरत जयवंत कुरणे (वय ३७, रा. धर्मवीर संभाजी गल्ली, बेळगाव) व वासुदेव भगवान सूर्यवंशी (२९, रा. करकी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) यांना अटक केली आहे. त्यांच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद मांडला. टेंबलाईवाडी येथे झालेल्या बैठकीत तावडेने कुरणेकडे पिस्तूल दिले. त्याने ते बेळगावला नेऊन नष्ट केले; तर सूर्यवंशी याने मोटारसायकलींची विल्हेवाट लावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संशयितांकडून पिस्तूल आणि दुचाकी हस्तगत करायच्या आहेत. त्यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी विनंती अॅड. राणे यांनी केली. त्यानुसार न्यायाधीश राऊळ यांनी दोघांना १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली.कामाची चर्चा नकोपानसरे हत्येनंतर संशयित अमोल काळे याने भरत कुरणे याला फोन करून बोलावून घेतले. ‘तू कोल्हापूरच्या कामाची मित्रांमध्ये सतत चर्चा करत असतोस, असे कानांवर आले आहे. याबाबत कोणाला काहीच बोलू नकोस; नाहीतर अडचणीत येशील,’ अशी समज कुरणेला दिल्याचे तपासात पुढे आले.