कोल्हापूर : आपले संपूर्ण आयुष्य सामान्य कष्टकरी जनतेसाठी वेचणारे ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असून, याचा प्रारंभ मंगळवारी (दि. १६) सकाळी दहा वाजता होत आहे. स्मारकाचे काम अत्यंत सुबक, दर्जेदार तसेच सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरेल अशाप्र्रकारे साकारण्याचा महानगरपालिका तसेच पानसरेप्रेमींचा प्रयत्न आहे. गोविंद पानसरे यांचे स्मारक शास्त्रीनगर येथील वि. स. खांडेकर शाळेलगतच्या मोकळ्या जागेत उभारण्यात येणार असून, त्यांच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने उचलली आहे. महानगरपालिकेने त्यासाठी २० लाखांची तरतूद सुद्धा केली आहे. पानसरेप्रेमींनी स्मारकाची संकल्पना मांडली असून, प्रत्यक्षात ते कागदावर आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी उतरविले आहे. पानसरे यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित शिल्पांचा त्यामध्ये समावेश असेल. स्मारकाचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा संकल्प आहे.गुरुवारी सायंकाळी महापौर अश्विनी रामाणे यांनी स्मारकाच्या जागी जाऊन प्रत्यक्ष पाहणी तसेच माहिती करून घेतली. यावेळी आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी त्यांना इत्यंभूत माहिती करून दिली. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, सभागृह नेता प्रवीण केसरकर, गटनेता सुनील पाटील, नगरसेविका सूरमंजिरी लाटकर, उपशहर अभियंता एस. के. माने, कनिष्ठ अभियंता एन. एस. पाटील, सतीश कांबळे, चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, बी. एल. बरगे, रूपाली कदम, आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील शास्त्रीनगर येथे वि. स. खांडेकर शाळेच्या परिसरात होणाऱ्या गोविंद पानसरे यांच्या स्मारकाबाबतची माहिती आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांच्याकडून घेताना महापौर अश्विनी रामाणे. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, सूरमंजिरी लाटकर, सतीश कांबळे, सुनील पाटील, प्रवीण लिमकर, आदी उपस्थित होते.
पानसरेंचे स्मारक तीन महिन्यांत
By admin | Published: August 12, 2016 12:05 AM