संतोष मिठारी ।कोल्हापूर : एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला (सिंगल यूज प्लास्टिक) पर्याय म्हणून जेवणाचे पार्सल देण्यासाठी जाड कागदी आणि पुन्हा वापरता येतील असे प्लास्टिकचे डबे वापरणे, अनामत रक्कम घेऊन स्टीलचे डबे देण्याची सुविधा पुरविण्याचे कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकांनी पाऊल टाकले आहे.
केंद्र सरकारने महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नका, असे आवाहन व्यावसायिकांना केले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या मार्गदर्शनाखाली सिंगल यूज प्लास्टिकला पर्याय देण्याच्या दृष्टीने काही पावले टाकली आहेत. मुंबई, पुणे येथील संघटनांशी या संघाने चर्चा केली आहे. कोल्हापुरात सध्या जेवण, खाद्यपदार्थ पार्सल म्हणून देण्यासाठी सध्या कागदी आणि पुन्हा वापरता येतील अशा प्लास्टिक डब्यांचा उपयोग केला जात आहे. काही व्यावसायिकांनी पार्सलसाठी अनामत रक्कम घेऊन स्टीलचे डबे देण्याचा पर्याय निवडला आहे. पाण्यासाठी प्लास्टिक बाटल्यांचा वापर टाळण्यासाठी हॉटेलमध्ये शुद्धिकरण यंत्रणा बसविली आहे. प्रत्येक टेबलवर काचेचा जार, ग्लास ठेवले आहेत. पर्यावरण रक्षणासह पाणीबचतीसाठी ‘अर्धा ग्लास पाणी’ संकल्पना गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग, पर्यावरणतज्ज्ञ यांच्या माध्यमातून ग्राहक, व्यावसायिकांमध्ये प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत प्रबोधन केले जात आहे.‘अॅल्युमिनिअम’बाबत स्पष्टता हवीअॅल्युमिनिअम फॉईल्सचे कंटेनर (डबे) अथवा कागद यांचा पार्सलसाठी वापर करण्याचा चांगला पर्याय आहे; मात्र ते वापरू नये, इतकेच महानगरपालिकेकडून सांगितले जात आहे. त्याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी काही व्यावसायिकांमधून होत आहे.
पार्सलसाठी वापरल्या जाणाºया ५०० ते १००० मि.लि. क्षमतेच्या कागदी डब्यांसाठी ११ ते १४ रुपये द्यावे लागतात. त्याचा भुर्दंड आमच्यासह ग्राहकांना बसत आहे. कागदी डब्यातून पार्सल देताना अनेकदा अडचणीचे ठरत आहे. त्याचा विचार करून किमान ५० मायक्रॉनवरील पिशव्या वापरण्यास शासनाने परवानगी द्यावी.- सिद्धार्थ लाटकर, हॉटेल व्यावसायिक
प्लास्टिकचा वापर टाळणे आज काळाची गरज आहे. आम्ही हॉटेल मालक, व्यावसायिकांनी बहुपयोगी प्लास्टिक डबे, कागदी कप, डबे अशा पर्यायांचा स्वीकार केला आहे. पार्सलसाठी स्टील डबे, कापडी पिशव्या आणाव्यात, असे ग्राहकांना आवाहन केले आहे. - आनंद माने, हॉटेल व्यावसायिक
सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत हॉटेल व्यावसायिकांना सूचनांसह कागदी डबे, कापडी पिशव्यांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार कार्यवाही केली नाही, तर त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.- दिलीप पाटील, आरोग्य अधिकारी, मनपा
पाण्यासाठी काचेचे ग्लास आणि जार, पार्सलसाठी कागदी डबे आणि पिशव्यांचा वापर केला जात आहे; मात्र यातील काही पर्यायांचा वापर करताना अडचणी निर्माण होत आहेत. सिंगल यूज प्लास्टिकला सक्षम आणि पर्यावरणपूरक पर्याय विद्यापीठ, महाविद्यालयातील संशोधक अथवा पर्यावरणतज्ज्ञांनी द्यावा.- सचिन शानबाग, उपाध्यक्ष, कोल्हापूर हॉटेल मालक संघ
- जिल्ह्यातील लहान-मोठ्या हॉटेल्सची संख्या 6000
- शहरातील हॉटेल्सची 450संख्या