कागल : कागल नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. कागल शहरात महात्मा बसवेश्वर, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुतळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या. उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, मुख्याधिकारी पंडित पाटील प्रमुख उपस्थितीत होते. या सभेत ४० विषय होते. विषयपत्रिकेचे वाचन सुरेश रेळेकर यांनी केले. शहरात विविध महापुरुषांचे पुतळे उभारले जात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवराज्य मंचने राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार बॅ. खर्डेकर चौकात शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल. निपाणी वेस परिसरात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा तर बसस्थानकासमोर ज्येष्ठ नेते विक्रमसिंह घाटगे यांचा पूर्णाकृती पुतळा तसेच ठाकरे चौक अथवा जयसिंगराव पार्क येथे सदाशिवराव मंडलिक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. सध्या बसस्थानकासमोर जयसिंगराव घाटगे ऊर्फ बाळ महाराज यांचा पुतळा आहे. तेथे विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा उभारून जर घाटगे परिवाराने परवानगी दिली तर बाळ महाराज यांचा पुतळा जयसिंगराव पार्कात एखाद्या मुख्य चौकात बसवण्याचे ठरले. या सभेत विविध विषयांवर झालेल्या चर्चेत प्रवीण काळबर, विशाल पाटील, नितीन दिंडे, दीपाली भुरले, विजया निंबाळकर, सौरभ पाटील, जयश्री शेवडे, विवेक लोटे आदींनी भाग घेतला.
सभेतील महत्त्वाचे निर्णय
येथील धनगर समाजाचे मुख्य मंदिर असलेल्या बीरदेव मंदिरासमोर मंडप उभारणी व परिसर सुशोभीत करावा, अशी मागणी जयश्री शेवडे यांनी केली. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. तसेच खर्डेकर चौकात महिलांच्यासाठी जिम सुरू करणे, महात्मा गांधी वाचनालय येथे अभ्यासिका विकसित करणे, तसेच जयसिंगराव तलाव पाणलोट क्षेत्राचे नव्याने निश्चितीकरण करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.