कोल्हापूर : राष्ट्रभक्तीपर गीते, टाळ मृदुंगाच्या तालात आणि भगवान परशुराम यांच्या जयघोषात येथे परशुराम जयंतीनिमित्त शुक्रवारी संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात आली. अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, श्रीराम, सीता, लक्ष्म यांचा सजीव देखावा, ब्राह्मण समाजातील सर्व क्षेत्रातील कर्तबगारांचे फलक, धनगरी ढोल, ब्रह्मवृंदाकडून होत असलेले मंत्रोच्चार, महिलांचे लेझीम पथक अशा भारलेल्या वातावरणात ही शोभायात्रा काढण्यात आली.जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत शोभायात्रेला सुरूवात करण्यात आली. पेटाळा मैदानावर सुरू झालेली ही शोभायात्रा महाव्दार रोड, ताराबाई रोड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही शोभायात्रा पुन्हा पेटाळा मैदानावर आली.
पालखीमध्ये परशुराम यांच्या पादुकांसह छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमाही ठेवण्यात आल्या होत्या. जयंतीनिमित्ताने सकाळी कात्यायनी परिसरातील परशुराम मंदिरात अभिषेक करण्यात आला. शहरातील १६ ब्राह्मण संघटनांनी या शोभायात्रेचे आयोजन केले होते.